सिडको पोलिसांनी अवघ्‍या काही तासात चोरट्याला ​ बेड्या ठोकल्या

औरंगाबाद,४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पत्‍नीच्‍या उपचारासाठी शहरातील एका हॉस्पिटल मध्‍ये आलेल्या वृध्‍दाला छान गप्‍पा मारल्यानंतर चहा पाजण्‍याच्‍या बहाण्‍याने हॉस्पिटल बाहेर आणुन त्‍यांची २२ हजारांची रोख रक्कम घेवून पसार झालेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाला सिडको पोलिसांनी अवघ्‍या काही तासात बेड्या ठोकल्या. ही घटना शनिवारी दि.३ दुपारी साडेबारा वाजेच्‍या सुमारास एमजीएम हॉस्पिटल समोर घडली.

हुसेन हसन मदारी (२४, रा. म्हाडा कॉलनी, देवळाई) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. तर सिराज सलीम मदारी (रा. बन्‍होटी गाव, ता. सोयगाव) असे पसार असलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपीला ६ सप्‍टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एम. भंडे यांनी रविवारी दि.४ दिले.

या प्रकरणात भागाजी भिक्कन साळुंके (७०, रा. धानोरा, टाकळी कोलते ता. फुलंब्री) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, ३ सप्‍टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्‍या सुमारास फिर्यादी यांची पत्‍नी कडुबाई यांची प्रकृती अचानक खालावली, त्‍यामुळे फिर्यादी व त्‍यांचा मुलाने कडुबाई यांना एमजीएम हॉस्‍पीटल येथे उपचारासाठी आणले होते. फिर्यादी यांची पत्‍नी व मुलगा हे सोनोग्राफीसाठी गेले होते. तेंव्‍हा फिर्यादी हे एकटे ओपीडी मध्‍ये बसलेले होते. संधी साधत दोन भामटे फिर्यादी जवळ येवून बसले. त्‍यांनी फिर्यादीला गोड बोलत त्‍यांचा विश्‍वास संपादन केला. त्‍यानंतर दोघा आरोपींनी फिर्यादीला चहा पिण्‍यासाठी हॉस्पिटल बाहेर आणले. चहा प्‍यायल्यानंतर फिर्यादीने चहाचे पैसे देण्‍यासाठी खिशातून पैसे काढले असता, आरोपीपैकी एकाने त्‍यांचे पैसे हिसकावून घेतले तर दुसरा आरोपी दुचाकी (क्रं.एमएच-१९-एएम-२१५८) घेवून तेथे आला. त्‍यानंतर दोघे आरोपी दुचाकीवर बसुन पसार झाले. फिर्यादीच्‍या खिशात २२ हजारांची रोख रक्कम होती. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्याचा तपास करुन सिडको पोलिसांनी अवघ्‍या काही तासात आरोपींपैकी एक हुसेन मदारी याला बेड्या ठोकल्या. त्‍याच्‍याकडून १४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी जप्‍त करण्‍यात आली.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी गुन्‍ह्यातील उर्वरित रक्कम हस्‍तगत करायची आहे. आरोपीच्‍या साथीदाराला अटक करायची आहे. गुन्‍ह्याज जप्‍त करण्‍यात आलेली दुचाकी कोणाची आहे याचा तपास तसेच आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.