मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार विजय चौधरी यांना चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार प्रदान

खुलताबाद,७ जानेवारी  / प्रतिनिधी :-कृषी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल  खुलताबाद येथील पत्रकार विजय चौधरी यांना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता  पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

अप्रतिम मीडियाच्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारितेद्वारे अनमोल योगदान असणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रारंभी मराठी पत्रकार दिनानिमित्त ”दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या वेळी अप्रतिम मीडियाचे डॉ अनिल फळे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर, सिने अभिनेते व निर्माते  मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष  मंदार पारकर तसेच  एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक  अभिजीत पाटील, निमंत्रक उद्योगपती विवेक देशपांडे व रणजीत कक्कड यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजय चौधरी हे गेल्या तीस वर्षांपासून खुलताबाद येथे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकार विजय चौधरी यांना यापूर्वी गत तीस वर्षांपासून निष्कलंक व निस्वार्थीपणे  पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल व लिखाणाबद्दल अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सकारात्मक पत्रकारिता कशी असावी, याचा वस्तुपाठ पत्रकार विजय चौधरी यांनी घालून दिला आहे, त्यांनी भविष्याचा वेध घेणारी पत्रकारिता केली असून खुलताबाद तालुक्यातील पत्रकारितेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. विजय चौधरी यांनी पत्रकार म्हणून कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या समस्या प्रकर्षाने मांडल्या आहेत. एकूणच ग्रामीण भागासाठी गुणवत्तापूर्ण वृत्तसंकलन केले आहे. अप्रतिम मीडीयाचे संचालक डॉ अनिल फळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विवेक देशपांडे यांनी केले. या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल विजय चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.