विकासाची प्रेरणा देणारी पत्रकारिता असावी- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड

 पत्रकार विजय चौधरी यांचा सपत्नीक सत्कार

खुलताबाद,१६ जानेवारी / प्रतिनिधी :- पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथास्तंभ आहे. आपल्या भागाच्या विकासाला चालना देण्यासह विकासकामांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आहे. विकासाची प्रेरणा देणारी पत्रकारिता असावी, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केले.

पेस कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे पत्रकार विजय चौधरी यांच्या सत्कार समारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खुलताबाद येथील पत्रकार विजय चौधरी यांना राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते

पत्रकार विजय चौधरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी पत्रकार विजय चौधरी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आनंद होत असल्याचे सांगून चौधरी यांनी तीस वर्षे केलेल्या पत्रकारितेची हि पावती आहे. विजय चौधरी यांची बातमी नेहमीच सकारात्मक असते. आपल्या भागाचा विकास व्हावा, नागरीकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन लवकरच त्यांची केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलास चौधरी यांची भेट घेऊन केंद्रीय कृषी समितीवर काम करण्यासाठी शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार डॉ अनिल फळे, प्रमोद माने,  मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी, जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुनीलचंद्र वाघमारे, सचिव कानिफ अन्नपूर्ण, अध्यक्ष कृषी तज्ञ उदय देवळाणकर, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल जी गायकवाड, माजी सभापती भीमराव खंडागळे, माजी सभापती गणेश अधाने, माजी उपसभापती दिनेश अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे यांनी केले. 

या वेळी जेष्ठ पत्रकार डॉ अनिल फळे, प्रमोद माने, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, प्रगतिशील शेतकरी पुंडलिक वाघ, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन, गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी यांनी पत्रकार विजय चौधरी यांच्या तीस वर्षात पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीवर प्रकाश टाकला. जेष्ठ पत्रकार प्रमोद माने यांनी विजय चौधरी यांची तीस वर्षातील पत्रकारिता जवळून पाहिली आहे. डॉ अनिल फळे यांनी चौधरी यांना पत्रकार होण्याची संधी दिली असली तरीही आपण त्यांना पत्रकारितेत पुढे आणले. खुलताबाद तालुक्याच्या विकासासाठी, पर्यटन विकासासाठी, कृषी क्रांती व्हावी म्हणून झटणारा हा आगळावेगळा पत्रकार आहे. विकास पत्रकारिता कशी असावी याचे उत्तम उदाहरण विजय चौधरी आहे. अलीकडच्या काळात त्यांनी विकास पत्रकारिता हि संकल्पना मांडली. तालुक्यात विकास पत्रकारितेची मुहूर्तमेढ विजय चौधरी यांनी रोवली.  पर्यटन क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. तालुक्यातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांकडे त्यांची नजर टाकली त्याची बातमी केली तर ते पर्यटन स्थळ उदयास येते. चौधरी यांच्या पत्रकारितेचा सन्मान म्हणजे खुलताबाद तालुक्याचा सन्मान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख माने यांनी केला.  या सत्कारामुळे आपल्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करून  विजय चौधरी व दीपा चौधरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भदाणे यांनी केले. पत्रकार श्रीकांत कुलकर्णी यांनी आभार मानले. या वेळी उपक्रमशील शिक्षक राजेंद्र वाळके यांनी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

या वेळी उद्योजक सुनीत आठल्ये, राजेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल जी गायकवाड, माजी सभापती भीमराव खंडागळे, पंचायत समितीचे माजी सभापती गणेश अधाने, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू वरकड, प्रकाश चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष सतीश दांडेकर, माजी नगरसेवक परसराम बारगळ,योगेश बारगळ, तालुक्यातील पत्रकार, डॉक्टर, वकील, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.