नववर्षाचे उत्साहात स्वागत!

ऑकलंड : न्यूझीलंडच्या ऑकलंड या सर्वात मोठ्या शहरात 2023 चा पहिला दिवस उगवला आणि सर्वांनी जल्लोष साजरा केला. अवघ्या जगात 2022 ला थाटात निरोप देण्याची तयारी सुरू असताना येथील नागरिकांना मात्र नववर्षाचे सर्वप्रथम स्वागत करण्याची संधी मिळाली.

ऑकलंड हे न्यूझीलंडचे सर्वात मोठे शहर आहे. उत्तर बेटावरील या शहरात न्यूझीलंडची तब्बल 31 टक्के लोकसंख्या राहते. येथील नागरिकांनी शुक्रवारी मध्यरात्री बरोबर बाराच्या ठोक्याला 2023 चे फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. ऑकलंड पाठोपाठ जगभरातील देशांनीही जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. मुंबईसह संपूर्ण भारतातही मध्यरात्री १२ वाजता मोठ्या जल्लोषात, फटाक्यांची आतषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील ऑपेरा हाऊस भागातही नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठा जल्लोष करण्यात आला. या ठिकाणी नववर्षाला 3 तास शिल्लक असताना फटाक्यांची आतषबाजी केली जाते. बालगोपाळांना या जल्लोषात सहभागी होता यावे, यासाठी असे केले जाते.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, दुबई, अबुधाबीतही नववर्षाच्या निमित्ताने जोरदार आतषबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या रोषणाईने येथील आसमंत उजळून गेले.