लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपची तयारी सुरू:राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची 2 जानेवारी रोजी जाहीर सभा

औरंगाबाद,३१ डिसेंबर / प्रतिनिधी :- गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने मिशन 2024 ची तयारी सुरू केली आहे.देशातील ज्या लोकसभा मतदार संघात भाजपाचे खासदार नाहीत, अशा 144 जागांवर पक्ष अत्यंत प्रभावी आणि नियोजनबध्द योजना राबविण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात अशा १६ जागा आहेत, जिकडे विशेषत्त्वाने लक्ष घातले जात आहे.  थेट जाहीर सभा घेत लोकसभा प्रचाराचा बिगुलच औरंगाबादमधून वाजेल.  

औरंगाबाद  त्यातले एक लोकसभा मतदार संघ आहे. काही महिन्यांपूर्वी भूपेंद्र यादव   येथे येऊन गेलेत. याच योजनेचा पुढचा भाग म्हणून येत्या 2 जानेवारी 2023 रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांचा औरंगाबाद  दौरा आखला गेला असून, सायंकाळी ६ वाजता त्यांची येथे जाहीर सभा होणार आहे.ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

भाजपने वर्षभर आधीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जाहीर सभेने २ जानेवारी रोजी औरंगाबादेतून फुटणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती राहणार आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे २ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता चंद्रपूर येथून औरंगाबादेत आगमन होईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे,राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर ,जिल्हा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर,जिल्हाध्यक्ष विजय औताडे ,माजी महापौर बापू घडामोडे   आदींची सभेला प्रमुख उपस्थिती राहील. नड्डा सर्वप्रथम वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी जातील. तेथून सरळ सभासस्थानी ५.३० वाजता हजर होतील. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभा संपल्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून नंतर मुंबईकडे रवाना होतील.

येणार्‍या लोकसभेच्याद्दष्टीने आणि लवकरच होणार्‍या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे. पी. नड्डा  यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील ज्या 16 जागांवर सध्या भाजपाचे खासदार नाहीत, त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्याद्दष्टीने केंद्रीय नेतृत्वाचे दौरे आयोजित करण्यात येत आहेत.