गतिशक्ती समग्र प्रशासनाचा विस्तार आहे,पंतप्रधानांनी पीएम गतीशक्तीचा केला प्रारंभ

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पामुळे पुढील 25 वर्षांसाठी भारताचा पाया रचला जात आहे

गति शक्ती या महाअभियानाच्या केंद्रस्थानी भारतातील लोक, भारतीय उद्योग, भारताचा व्यापार , भारतीय उत्पादक, भारतीय शेतकरी आहेत

आम्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची केवळ कार्यसंस्कृती विकसित केली नाही तर प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आहेत

Banner

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी पीएम गति शक्ती – राष्ट्रीय महायोजनेचा प्रारंभ केला.  नवी दिल्लीतील प्रगती मैदानावरील नवीन प्रदर्शन संकुलाचे उद्घाटनही त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, हरदीपसिंग पुरी, सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि  अश्विनी वैष्णव,  आर के सिंह, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, राज्य मंत्री , प्रख्यात उद्योगपती यावेळी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार  मंगलम बिर्ला, ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट्सच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक  मलिका श्रीनिवासन, टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष  टीव्ही नरेंद्रन आणि रिविगोचे सह-संस्थापक दीपक गर्ग  यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी आज अष्टमीचा शुभ दिवस, शक्तीची उपासना करण्याचा  दिवस असल्याचे सांगितले आणि  या शुभ प्रसंगी, देशाच्या प्रगतीची गती देखील नवीन शक्ती प्राप्त करत आहे असे ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत या संकल्पामुळे  पुढील 25 वर्षांसाठी भारताचा पाया आज रचला जात आहे. पीएम गति शक्ती राष्ट्रीय महा योजना (मास्टर प्लॅन ) भारताचा आत्मविश्वास आत्मनिर्भरतेच्या संकल्प सिद्धीकडे घेऊन जाईल असे ते म्हणाले.  “हा मास्टर प्लान 21 व्या शतकातील भारताला गती शक्ती देईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

भारतातील जनता, भारतीय उद्योग, भारतीय व्यवसाय, भारतीय उत्पादक, भारतीय शेतकरी गतिशक्तीच्या या महाअभियानाच्या केंद्रस्थानी आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला .  भारताच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना 21 व्या शतकातील भारत घडवण्यासाठी ते नवी ऊर्जा देईल आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करेल.

पंतप्रधान म्हणाले की, वर्षानुवर्षे ‘काम प्रगतीपथावर आहे ’ ही संज्ञा  विश्वासाच्या अभावाचे प्रतीक बनली होती. ते म्हणाले की प्रगतीसाठी वेग, उत्सुकता आणि सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. आज 21 व्या शतकातील भारत जुनी व्यवस्था आणि पद्धती मागे टाकत आहे, असे ते म्हणाले.

“आजचा मंत्र आहे  –

प्रगतीसाठी काम

प्रगतीसाठी संपत्ती

प्रगतीसाठी  नियोजन

प्रगतीला प्राधान्य

आम्ही केवळ निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची कार्यसंस्कृती विकसित केली नाही तर आता प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

आपल्या देशातील पायाभूत सुविधांना  बहुतांश राजकीय पक्षांचे प्राधान्य नसल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला.  त्यांच्या जाहीरनाम्यातही ते दिसत नाही. आता परिस्थिती अशी आली आहे की काही राजकीय पक्षांनी देशासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर  टीका करायला सुरुवात केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. शाश्वत विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे हा एक सिद्ध झालेला मार्ग आहे हे जागतिक स्तरावर स्वीकारले गेले आहे आणि यामुळे अनेक आर्थिक घडामोडीना  चालना मिळते आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान म्हणाले की, समन्वयाचा अभाव, आगाऊ माहितीचा अभाव, सर्वांना सोबत घेऊन काम न केल्यामुळे सूक्ष्म  नियोजन आणि सूक्ष्म अंमलबजावणीच्या समस्यांमधील वाढत्या तफावतीमुळे  प्रकल्प उभारणीवर परिणाम होऊन खर्च देखील  वाया जात आहे. शक्ती कित्येक पटीने वाढण्याऐवजी तिचे विभाजन होते  असे ते म्हणाले. पीएम गति शक्ती राष्ट्रीय महायोजना ही समस्या दूर करेल  कारण मास्टर प्लॅनच्या आधारे  काम केल्यामुळे संसाधनांचा योग्य  वापर होईल.

पंतप्रधानांनी 2014 ची आठवण सांगितली,  जेव्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आणि  रखडलेल्या शेकडो प्रकल्पांचा आढावा घेतला , सर्व प्रकल्प एकाच मंचावर ठेवले आणि अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला.  आता समन्वयाच्या अभावी विलंब टाळण्यावर भर दिला जात आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.  पंतप्रधान म्हणाले की, आता संपूर्ण सरकारी दृष्टिकोनासह , सरकारची सामूहिक शक्ती योजना पूर्ण करण्याकडे वळवली जात आहे. यामुळे, अनेक दशकांपासूनचे अनेक अपूर्ण प्रकल्प आता पूर्ण होत आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधान गती शक्ती महायोजना केवळ सरकारी प्रक्रिया आणि त्याच्या विविध हितधारकांनाच एकत्र आणत नाही तर वाहतुकीच्या विविध साधनांना  एकत्र आणण्यास मदत करते, असे पंतप्रधानांनी सांगितले.  “हा समग्र प्रशासनाचा विस्तार आहे” असे ते म्हणाले .

भारतातील पायाभूत विकासाचा वेग वाढवण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल यावेळी पंतप्रधानांनी सविस्तर विवेचन केले. भारतात पहिली आंतरराज्य नैसर्गिक इंधनवायू वाहिनी (नॅचरल गॅस पाईपलाईन)1987 मध्ये टाकण्यात आली. त्यानंतर 27 वर्षांमध्ये म्हणजे 2014 पर्यंत 15,000 किमी एवढ्या लांबीच्या वाहिन्यांचे काम करण्यात आले. आज मात्र देशभरात 16000 किमीहून लांब वाहिन्यांची कामे देशभरात सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. हे काम पुढील पाच ते सहा वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2014 च्या पाच वर्षे आधी फक्त 1900 किमी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाले होते. गेल्या सात वर्षात 9 हजार किलोमीटरहून जास्त रेल्वे मार्ग दुपदरी झाल्याचे ते म्हणाले. 2014 च्या पाच वर्षे पूर्वीपर्यंत फक्त 3000 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते, मात्र गेल्या सात वर्षात 24000 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्याची माहिती मोदींनी दिली. 2014 च्या पाच वर्षे आधीपर्यंत केवळ 250 किमी मार्गावर मेट्रो धावत होती, मेट्रोचे आता 700 किलोमीटरपर्यंत विस्तारीकरण होऊन शिवाय 1000 किलोमीटरच्या नवीन मेट्रोमार्गांवर काम सुरू आहे. 2014 च्या पाच वर्षे पूर्वीपर्यंत फक्त 60 पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या होत्या. आम्ही 1.5 लाखांहून अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या, असे त्यांनी सांगितले.

देशातील शेतकऱ्यांचे, मश्चिमारांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर प्रक्रियांशी संबधित पायाभूत सुविधा वेगाने वाढवल्या पाहिजेत असे पंतप्रधानांनी सांगितले. 2014 मध्ये देशात फक्त 2 मेगा फूड पार्क होते आज देशभरात मिळून 19 मेगाफूडपार्क कार्यरत आहेत, आणि आता त्यांची संख्या चाळीसीपार नेण्याचे लक्ष्य आहे. 2014 मध्ये फक्त 5 जलमार्ग अस्तित्वात होते तर आज भारतात 13 जलमार्ग कार्यान्वित आहेत. 2014 मध्ये बंदरांवर जहाजाला 41 तास प्रतिक्षा करावी लागे तो वेळ आता 27 तासांवर आला आहे, या बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाला वन नेशन वन ग्रिड या वचनाचा अर्थ उमगला आहे. आज भारतात 4.25 लाख सर्किट किलोमीटर वीज वितरणाचे जाळे आहे. 2014 मध्ये हे जाळे फक्त 3 लाख सर्किट किलोमीटर होते.

दर्जेदार पायाभूत सुविधांसह भारत हा उद्योगांची राजधानी असण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकेल याची खात्री पंतप्रधानांनी व्यक्त केली. आमची उद्दिष्टे असामान्य आहेत आणि त्यासाठी असामान्य प्रयत्नांची आवश्यकता आहे.  ही उद्दिष्टे प्रत्यक्षात आणताना पीएम गतीशक्ती ही मोठी महत्वाची सहकार्य करणारी बाब असणार आहे. JAM  म्हणजेच जनधन आधार आणि मोबाईल ही त्रिसूत्री जनतेपर्यंत सरकारी सुविधा पोचवणारी ठरली त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा क्षेत्रात ‘पीएम गतीशक्ती’ महत्वपूर्ण काम करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.