रोटेगाव-औरंगाबाद रेल्वेस्थानकादरम्यान विजेवरील इंजिनची चाचणी पूर्ण ; अवघ्या 50 मिनिटांत पल्ला गाठला

वैजापूर,३० डिसेंबर / प्रतिनिधी :- दक्षिण – मध्य रेल्वेच्या अंकाई – औरंगाबाद मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (ता.30) विद्युतीकरणाची तपासणी होऊन विजेवरील इंजिनाची चाचणी घेण्यात आली. रोटेगांव-औरंगाबाद अवघ्या 50 मिनिटांत टप्पा गाठला. रोटेगांव रेल्वेस्थानकावर इंजिन चालकाचे ग्राहक संघटनेचे दामोदर पारीक व भाजपचे गौरव दोडे यांनी सत्कार केला.

अंकाई ते रोटेगांव मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2022 मध्ये पूर्ण झाल्यानंतर आता रोटेगाव ते औरंगाबाद पर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर विजेचे इंजिन चालविण्यात आले.

रोटेगांव येथे विजेचे मोठे टॉवर व 132 केव्हीचे वीज उपकेंद्र उभारण्यात आले असून या केंद्रातून 132 केव्हीचा वीज पुरवठा घेतला जाईलआणि 25 केव्ही वीज बाहेर सोडली जाणार आहे. अंकाई, नगरसोल, तारुर, रोटेगांव, करंजगाव आदी स्थानकांना येथून वीजपुरवठा होणार आहे.