शाळेचा विद्युत पुरवठा खंडित होईल म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने चौकात उभे राहून गावकऱ्यांकडे मागितली मदत ; एका तासात जमा झाले 15 हजार

वैजापूर ,२ मार्च / प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील लासुरगांव येथील जिल्हा परिषद शाळेचे वीज बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित केला जाईल म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने गावातील चौकात उभे राहून गावकऱ्यांना मदतीचे आवाहन करताच गांवकरी मदतीला धावून आले अन तासाभरातच जमा झाली  वीज बिलाची 14 हजार 650 रुपयांची रक्कम   
आज शाळेला महाशिवरात्री निमित्तानं सुट्टी असून देखील लासुरगांव येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्रशाला आदर्श शाळेचे मुख्याध्यापक बी.एन. काळोखे यांनी गावात जाऊन चौकात उभे राहून वीज बिल 14 हजार 650 रूपये आज न भरल्यास शाळेचा वीजपुरवठा खंडीत होईल हे वीज बिल भरायचे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर मांडला व पालकांनी समोर येऊन बील भरण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन  करताच गावकऱ्यांनी  50 रुपये,100 रुपये,200 रुपये व 500 रुपये अशी मदत करून मुख्याध्यापकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एका तासात रक्कम जमा केली व लगेचच लाईनमन पिल्लाई यांच्याकडे लाईट बील 14 हजार 650 रुपये नगदी जमा केले. लोकसहभागातून शाळा लाईटबील मुक्त झाली.त्याबद्दल सर्वाचे मुख्याध्यापक श्री.काळोखे यांनी आभार मानले. याउपक्रमाचे सर्वच पालकांनी कौतुक देखील केले.गावकऱ्यांनी मनावर घेतले तर काय बदल होतो याचे लासुरगाव चे उदाहरण इतरांना प्रेरणादायी आहे