राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे 

औरंगाबाद : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचे भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भ्रष्टाचार, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्यावधी निवडणूक लागण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यामध्ये नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले.

दरम्यान, रावसाहेब दानवे बोलताना म्हणाले की, राज्यातील आताची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा दानवे यांनी यावेळी केला. रावसाहेब दानवे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.