वर्षा संजय राऊतांना ईडीची नोटीस

मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवलीय. ही नोटीस पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

संजय राऊतांच्या जवळचे असणारे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊतांच्या अकाऊंटमधून काही व्यवहार वर्षा राऊतांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. याप्रकरणी ईडी अधिक माहिती गोळा करतेय. याच पार्श्वभुमीवर वर्षा राऊतांना ईडीने नोटीस पाठवलीय. संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात प्रवीण राऊतांच्या अकाऊंटमधून वर्षा राऊतांच्या अकाऊंटमध्ये कर्ज घेतल्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या व्यवहारासंदर्भात ईडीला अधिक माहिती घ्यायची आहे.

या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री  आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी ३० डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.

खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं सांगितलं होतं.