‘अरे सगळंच उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं का?’; विधानसभेत का संतापले अजित पवार?

नागपूर ,२७ डिसेंबर/ प्रतिनिधी :-आज महाराष्ट्राच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात कर्नाटकविरोधी ठराव एकमताने मंजूर झाला. मात्र, यादरम्यान काही मुद्द्यांवरून गोंधळदेखील उडाला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे लक्षवेधीचा मुद्दा मांडत असताना रोखले आणि अजित पवारांनी ‘सगळंच उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं का?’ असे संतापातच विचारले. तसेच, यादरम्यान त्यांनी मराठवाडा आणि विदर्भाच्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना टोले लगावले. “गेल्या १० वर्षांच्या इतिहासात इतक्या पुरवण्या मागण्या नव्हत्या जितक्या सभागृहात मांडल्या, अर्थमंत्री म्हणून तुम्ही आर्थिक शिस्त मोडली आहे” अशी टीका अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

पुढे ते म्हणाले की, “सत्ता येते जाते. कोणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही, हे आपण लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थगिती सारख्या गोष्टी घडत नव्हत्या. मात्र, एकनाथ शिंदेंचे सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली. विदर्भाकडे जवळपास २० वर्ष मुख्यमंत्रिपद होते. ते फक्त पश्चिम महाराष्ट्राचे बघतात, असा आरोप आमच्यावर केला जातो. पण विदर्भात २० वर्ष मुख्यमंत्रिपद होते, मराठवाड्यातही मुख्यमंत्रिपद होते. मला जमेल तितकं मी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला बदनाम करण्यात आले,” अशा भावना अजित पवार यावेळी व्यक्त केल्या.