भारतीय विज्ञान काँग्रेस: विज्ञाननिष्ठांच्या मांदियाळीचा आठवडा

नागपूर शहर. भारतातील संत्रा नगरी. देशाचे टायगर कॅपिटल. कधी काळी गोंड राजांच्या राजधानीचे शहर. विविध सामाजिक चळवळींचे शहर. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक पासून तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीचे शहर. हे शहर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जगभर गाजले ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्याने…

भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन ३ ते ७ जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात  करण्यात आले. नागपूर विद्यापीठाचे हे शतकमहोत्सवी वर्ष. या वर्षात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी झाल्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे.यापूर्वी १९७४ मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी वर्षात हे आयोजन नागपुरातच व्हावे, यासाठी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रदर्शनातून ‘होस्ट स्टेट’च्या माध्यमातून राज्याची विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे आणली. या तीनही नेत्यांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावून महाराष्ट्रासारख्या विशाल प्रदेशात हा ज्ञान आणि विज्ञानाचा कुंभ होत असल्याचा आनंद व्यक्त केला. उद्घाटन कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रेरणादायी होते. शेती, मातीपासून अवकाशापर्यंत विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाचे नेतृत्व भारताला करायचे आहे त्यासाठी या महत्त्वपूर्ण आयोजनातून प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विज्ञान काँग्रेसमध्ये विविध विज्ञान आधारित कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा योनाथ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यात २७ परिसंवाद, बाल, महिला, शेतकरी व आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश होता. यंदा प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या विज्ञान परिषदेला एक लाखावर विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत सर्वच विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक दिग्गजांचा यात सहभाग होता. विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन  करण्यात आले होते.  देश -विदेशातील अनेक संशोधक,  वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते. प्रश्न उत्तरे, जिज्ञासा, आविष्कार, संशोधन अशा उपक्रमाने पाच दिवस हा परिसर भारावला होता.

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’ चे माजी संचालक डॉ. सतीश वाटे यांच्या हस्ते झाले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले. १० ते १७ वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले. देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांनी या प्रदर्शनाला उपस्थिती लावली. हे प्रदर्शन बघून पुढील शतकात विज्ञान तंत्रज्ञानावर भारताचा प्रभाव असेल याचा विश्वास वाटत होता. किशोरांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिमानांचे सादरीकरण केले. मोठ्या संख्येने शाळकरी मुलांनी या विज्ञानप्रदर्शनाचा लाभ घेतला.

यावर्षीच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे ब्रीदवाक्य होते, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानासह महिलांचे सक्षमीकरण’. त्यामुळे या काँग्रेसवर महिलांचा पहिल्या दिवसापासूनच प्रभाव होता. हे देशव्यापी आयोजन श्रीमती विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पूर्ण झाले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन  महिला काँग्रेसमध्ये करण्यात आले.   बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. असंख्य अडचणींवर मात करीत  केलेली वाटचाल राहीबाईंनी यावेळी कथन केली. या काँग्रेसचा समारोप रसायनशास्त्रांमध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा.ॲडा योनाथ यांनी केला.

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहाचे नाव होते शहीद बिरसा मुंडा सभागृह. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता. आदिवासी बहुल भागामध्ये प्रथमच आदिवासी आणि विज्ञान यांची सांगड घातली जात होती. ही एक स्तुत्य सुरुवात ठरली.

देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा शेतकरी विज्ञान काँग्रेस परिषदेतील सूर होता.

प्राईड इंडिया एक्सपो हे विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. दररोज सायं. सहा ते आठ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले.

समारोपाला कानपुरवरून नागपूर येथे दाखल झालेल्या विज्ञान ज्योतीला विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी डॅा. अरविंद सक्सेना यांना विज्ञानज्योत सोपवून अधिकृत समारोप जाहीर केला. खऱ्या अर्थाने विज्ञानाचा हा महाकुंभ विज्ञानप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरला. या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. सुभाष चौधरी व त्यांच्या चमूने केलेल्या मेहनतीचे विजयलक्ष्मी सक्सेना यांनी समारोपीय सोहळ्यात कौतुक केले. नागपूरच्या शिरपेचातील महत्त्वपूर्ण बाब म्हणून या कार्यक्रमाची नोंद असेल.

०००

-अतुल पांडे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर.