देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो मोर्चा झाला

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :- महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. या मोर्चाविरोधात भाजपने राज्यात ठिकठिकाणी माफी मांगो निदर्शने केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली.

महाविकास आघाडीचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते मोर्चा काढतात. दररोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. त्यामुळे हे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत येऊ. तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो आहे, तसा हा मोर्चा नॅनो होता. उद्धव ठाकरे यांची कॅसेट तशीच होती जी बदलली नाही. त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाही, अशा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत

दरम्यान, सीमाप्रश्नाचा वाद आजचा नाही. गेली साठ वर्षे हा वाद सुरू आहे. सीमा प्रश्नाला काँग्रेस जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.