महामोर्चा ‘मविआ’चा, चर्चा मात्र रश्मी ठाकरेंची; सक्रिय सहभागाने राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-महाविकास आघाडीने मुंबईमध्ये हल्लाबोल महामोर्चा आयोजित केला होता. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप नेते, प्रवक्ते आणि राज्यपालांविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सक्रिय सहभागाची चांगलीच चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून रश्मी ठाकरे यांनी अनेक राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. परंतु, भव्य मोर्चात सहभागी होण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्या महिलांशी चर्चा केली आणि मोर्चामध्ये त्या पुढे चालत होत्या.

रश्मी ठाकरे यांनी भाषण केले नाही, किंवा माध्यमांशी संवादही साधला नाही. काहीही न बोलता त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा त्या राजकारणात सक्रिय झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आजारपणात रश्मी ठाकरे यांनी सूत्रे सांभाळली असल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर बंडखोरी केलेल्या आमदारांच्या पत्नींशी रश्मी ठाकरेंनी संपर्क साधला होता. त्यांनी आमदारांच्या पत्नींना फोन करुन आपल्या पतींशी बोलून त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला होता, अशीदेखील चर्चा त्यावेळी होती. अनेकदा त्यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी मागणी केली जाते. तर, उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात ‘पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार, आणि पहिली महिला मुख्यमंत्री देणार’ असे वक्तव्य केल्यानंतर अनेकांनी पहिली पसंती ही रश्मी ठाकरेंना दिली असल्याचे सांगितले जाते.