मविआच्या महामोर्चाला भाजपने दिले ‘माफी मांगो’ने उत्तर; काय होत्या मागण्या?

मुंबई ,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-एकीकडे महाविकास आघाडीने मुंबईत भाजपविरोधात हल्लाबोल महामोर्चाचे आंदोलन केले. तर, दुसरीडकडे भाजपने माफी मांगो आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप नेते रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यासोबत काही वारकरी मंडळींचादेखील यामध्ये समावेश होता.

सुषमा अंधारे यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनतर सर्व वारकरी समाजाने त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता. काही दिवसांनी सुषमा अंधारेंनी जाहीर माफी मागताना भाजपवर टीकादेखील केली होती. तर, दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला होता, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. एकीकडे शिवसेना शिंदे गटाने आज १७ तारखेला ठाणे, डोंबिवलीमध्ये बंद पुकारला. तर, दुसरीकडे भाजपने रस्त्यांवर उतरत संजय राऊत आणि सुषमा अंधारेंविरोधात घोषणा दिल्या.

दरम्यान, भाजपने पाकिस्तान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात विविध जिल्ह्यात आंदोलने केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्याचे दहन करण्यात आले. पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदल अपशब्द वापरल्याने देश भरात भाजपाच्या वतीने भुट्टो यांच्या विरोधात आंदोलन केले.