अंमली पदार्थ विक्री व सेवनावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार-पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता

औरंगाबाद,१४ डिसेंबर / प्रतिनिधी :- औषध विक्री केंद्र चालकांनी अंमली पदार्थचा अंश असणाऱ्या औषधांची विक्री करताना रुग्णांचे आधारकार्ड आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा चिठ्ठीची खातरजमा करुन विक्री करावी. तसेच विविध भरारी पथकाच्या धाडीतून प्रतिबंध व कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले.

            या बैठकीस पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, मानसोपचारतज्ञ डॉ. जितेंद्र डोंगरे,  क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ, विक्रीकर विभागाचे अधीक्षक राजकुमार बैनाड, भारतीय डाक विभागाचे सहायक अधीक्षक संजय ताठे, कृषी विभागाचे उपसंचालक डी.एम.दिवटे, अन्न्‍ व औषध प्रशासनाच सहायक आयुक्त शा.ना.साळे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास आदी समिती सदस्य उपस्थित होते.

            तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढू नये यासाठी जिल्हास्तरीय व शहर समितीच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याबरोबरच या संबंधित आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य खबरदारी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन घेत असल्याचे सांगितले. औषध विक्री केंद्रावरील माहितीचा डेटा संबंधित पोलीस स्टेशनला आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. यासाठी वारंवार औषधी विक्री करणाऱ्या विक्री केंद्रावर भेटी देण्यात येणार आहे. 

            कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्या मार्फत गावपातळीवरील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मदतीने शेतीतील आंतरपिकात गांजा किंवा तत्सम पिकांची लागवडी संदर्भात प्रमाणपत्रासह अहवाल मागविण्याचे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले.  समाजात व्यसनधिनता वाढू नये म्हणून जाणीवजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन तसेच व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत समपुदेशन करावे. शाळा महविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजनात कलापथक, तज्ज्ञ व्यक्तीच्या मागदर्शनपर मुलाखती समाज माध्यमातून प्रसारित कराव्यात. या उपक्रमातून व्यसनांचे दुष्परिणाम होणारे नुकसान, आरोग्याविषयक आजारावर मार्गदर्शन करुन अंमली पदार्थ सेवनातून होणाऱ्या व्यसनाचे दुष्परिणामाविषयी व्यापक स्वरुपात जाणीव जागृती करावी असे डॉ.गुप्ता यांनी सांगितले.