कंत्राटदाराचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक 

औरंगाबाद,६​ डिसेंबर / प्रतिनिधी :- सिडको एन ३ भागातील कंत्राटदाराचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील तिघांच्‍या गुन्हे शाखेने गडचिरोली, चंद्रपुर येथून मुसक्या आवळल्या. त्‍यांच्‍या ताब्यातून गुन्‍ह्यात वापरेलेल्या टिकावासह ८ लाख २ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्‍यात आला आहे. आरोपींना १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी मंगळवारी दिले.लिगन्‍ना शालीक मन्नेकर (३०), दारासिंग हिरा बदकल (२९, दोघे रा. ता. बरोर जि. चंद्रपुर) आणि व्‍यकंटी रामा गोडमारे (३८, रा. विशिंवार्ड देसाईगंज ता. वडसा जि. गडचिरोली) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी साथीदार चंदू ईरा बदकल (रा. राजूनगर, हिंगणा रोड, नागपुर) आणि संगीता बन्‍टी लालोरकर (रा. ता. वारोरा जि. चंद्रपुर) यांनी मिळून घरफोडी करण्याची कबुली दिली. चोरीचे दागिने नंदकिशोर बाबुराव गजापुरे (५०, रा. देसाईगंज, गडचिरोली) याला विक्री केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला देखील अटक केली. अटक तिघे आरोपी हे सराईत गुन्‍हेगार असून त्‍यांच्‍यावर चंद्रपुर आणि गडचिरोलीत पाच गुन्‍हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.

शिवाजी अवधूत चव्हाण (६८, रा. प्लॉट नं. १७०, एन-३, सिडको) हे कंत्राटदार आहेत. २७ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता ते घराला बंगल्याला कुलूप लावून कुटुंबियांसह कोल्हापूर येथे नातीच्या लग्नासाठी गेले. ही संधी साधत चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्‍या-चांदीच्‍या दा‍गिन्‍यांसह सहा लाख ७४ हजार ९० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी गुन्‍ह्यातील उर्वरित ऐवज हस्‍तगत करायचा आहे. आरोपीच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. आरोपींनी गुन्‍ह्यात वापरलेला टिकाव कोठून व कोणाकडून आणला याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.