रेशनच्‍या धान्‍याची काळ्या बाजारात विक्री:दोघांच्‍या जिन्‍सी पोलिसांनी मुसक्या आवळल्या

औरंगाबाद,६​ डिसेंबर / प्रतिनिधी :- रेशनच्‍या धान्‍याचा साठा करुन त्‍याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या  दोघांच्‍या जिन्‍सी पोलिसांनी मंगळवारी दि.६ पहाटे मुसक्या आवळल्या. त्‍यांच्‍याकडून सुमारे ४५ क्विंटल ६० किलो गहु आणि तांदळाचा साठा आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्‍त करण्‍यात आला आहे. दोघा आरोपींना ७ डिसेंबरपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले.शेख कलीम शेख सलीम (२७, रा. नेहरुनगर, कटकटगेट) आणि मोईज खान जमाल खान (२१, रा. किराडपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात पुरवठा निरीक्षक कविता वसंत गिराने (३३) यांनी फिर्याद दिली. सोमवारी दि.५ सायंकाळी जिन्‍सी पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक तांगडे यांना माहिती मिळाली की, काही व्‍यक्ती मदनी चौकाजवळील एका घराच्‍या खोलीत शटरमध्‍ये रेशनच्‍या धान्‍याचा साठा करुन त्‍याची विक्री करीत आहेत. माहिती आधारे पोलिसांनी सायंकाळी साडेसात वाजेच्‍या सुमारास छापा मारुन वरील दोघांना अटक केली. त्‍यांची चौकशी केली असता सदरील धान्‍य हे रेशन दुकानदार आणि लाभार्थींकडून विकत घेतो व त्‍याची बाजारात विक्री करित असल्याची कबुली त्‍यांनी दिली. त्‍यांच्‍याकडून शासनाचा लोगो असलेले ३० रिकाम्या गोण्‍या, तांदुळाने भरलेल्या ११२ गोण्‍या आणि गव्‍हाणे भरलेल्या दोन गोण्‍या असा सुमारे ४५ क्विंटल ६० किलो वजानाचा साठा जप्‍त करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सराकरी वकील समीर बेदरे यांनी आरोपींनी कोणत्‍या रेशन दुकानदाराकडून धान्‍य खरेदी केले व ते धान्‍य कोणाला विक्री केले, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, आरोपींनी अशा प्रकारे आणखी धान्‍याचा साठी केला आहे का याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.