समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला उद्‍घाटन:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, याच दिवशी नागपूर येथील विस्तारित मेट्रो प्रकल्पाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.
सुमारे १० जिल्हे आणि २६ तालुक्यांतून गेलेल्या तसेच ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या ५२० किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. येत्या ११ डिसेंबरपासून हा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८० बांधकामे प्रस्तावित केली आहेत. त्याची संरचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वन्यजीवांचा वावर असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधक ठिकाण तयार केले आहे; तर आवश्यक ठिकाणी संरक्षणभिंतीची उभारणी केल्याचे एमएसआरडीसीने सांगितले.

आगामी काळात येणाऱ्या निवडणुका आणि यंदाचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधीच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्नभूमीवर मोदींचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे 15 ऑगस्टला करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र 15 लाही मुहूर्त हुकला, त्यानंतर शिंदे यांनी  महामार्ग लवकरच खुला होणार असल्याची घोषणा केली होती. 

असा आहे महामार्ग
लांबी – ७०१ किलोमीटर
खर्च – ५५ हजार ३३५ कोटी
मार्गिका – ३*३
वाहन वेगमर्यादा – १५० किमी प्रतितास (डोंगराळ भागात १२० किमी)
पहिला टप्पा – ५२० किलोमीटर
रस्त्यांची रुंदी – १२० मीटर (डोंगराळ भागात ९० मीटर)
इंटरचेंज – २४
रस्त्यालगतची नवनगरे – १८
मोठे पूल – ३३
लहान पूल – २७४
बोगदे – ६
रेल्वेओव्हर ब्रिज – ८
फ्लायओव्हर – ६५