लोणी खुर्द येथे महिला अत्याचारविरुद्ध जनजागृती फेरी

महिला सुरक्षित तर देश सुरक्षित  -सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी

वैजापूर, २५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- आज देशातील महिला व मुलींवर होणारे वाढते अन्याय, अत्याचार व छळवणूक थांबविण्यासाठी सर्व स्तरावर सर्वंकष प्रयत्न करून महिला व मुलींची सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे. कारण महिला सुरक्षित तर कुटुंब, समाज व देश सुरक्षित राहिल असे वक्तव्य वैजापूर उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधिक्षिका महक स्वामी यांनी तालुक्यातील लोणी (खुर्द) येथे “महिला हिंसा विरुद्ध दिवस” जनजागृती फेरीच्या शुभारंभ प्रसंगी शुक्रवारी केले.

पुढे बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, महिला व मुलींवर  कौटुंबिक ,सामाजिक हिंसाचारपासून संरक्षण कायदा 2005 व नियम 2006 ची माहिती महिलांपर्यत पोहचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे, या प्रसंगी प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते  धोंडीरामसिंह राजपूत होते. त्यांनीही उपस्थित महिला व मुलींना संबोधित करतांना स्वतः अतिशय दक्ष राहून स्वतःवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे यावे. पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या समुपदेशन केंद्राचा सल्ला घ्यावा असे आवाहन केले. पुरुषांनीही महिलाकडे पाहण्याचा वाईट दृष्टीकोन बदलावा व स्त्री दाक्षिण्य दाखवावे असे आवाहन पुरुषांना केले.

सदरील कार्यक्रम महिलांवर व मुलींवर होणारे विविध प्रकारचे अन्याय ,हिंसाचार थांबावे व महीलात जागृती व्हावी म्हणून 16 दिवशीय कार्यक्रम तालुक्यातील गावोगावी होणार आहेत. आज याचा आरंभ लोणी खुर्द या गावातून झाला. सामाजिक संस्था निर्मला इन्स्टिट्यूट व पोलीस स्टेशन वैजापूर मार्फत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या संस्थेच्या प्रमुख नॅन्सी रोद्रीग्ज यांनी ही जनजागृती रॅलीचा उद्धेश विशद केला. श्रीमती मार्गारेट व छाया बंगाळ यांनी सहभाग नोंदविला.

या प्रसंगी सरपंच अण्णासाहेब इंगळे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदीप इंगळे, अध्यक्ष मछिद्र इंगळे, सोसायटी चेअरमन प्रभाकर गुंजाळ, पो.कॉ.रामेश्वर काळे, पो.कॉ.लक्ष्मण पंडित, प्रीती इंगळे, कडू इंगळे, हरिभाऊ राशींकर, मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, शिक्षक ई.के.शिंदे, एम.एफ.दुशिंग, एल. ए.सय्यद, जे. आर.शेख, माया त्रिभुवन, पवन बागुल यांच्यासह महिला बचत गट महिला, मुली यांची गावातून जन जागृती फेरी हातात घोष वाक्य बॅनर घेऊन काढून जन जागृती करण्यात आली. नॅन्सी यांनी छाया बंगाळ यांनी आभार मानले.