वैजापूर येथील शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक करणाऱ्या शिक्षकाची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

राज्य महिला आयोगाचे अप्पर पोलीस अधीक्षक व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना आदेश

वैजापूर, १५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील एका शैक्षणिक संस्थेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीशी लैंगिक छळ व गैरवर्तणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने दखल घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

तिसऱ्या इयतेत शिकणाऱ्या विध्यार्थीनिशी लैंगिक चाळे व गैरवर्तवणूक केल्याची घटना शहरातील एका शिक्षण संस्थेत काही दिवसांपूर्वी घडली होती. विद्यार्थिनींचे पालक व नातेवाईक ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी सुध्दा गेले होते तसेच शाळा परीसरात नातेवाईकांनी धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर बराच प्रसारित झाला होता. 

घडलेला प्रकार निंदनीय आहे याला वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद येथील तरुण मोहम्मद इसा यासीन याने राज्य महिला आयोगाकडे संबंधित प्रकरणाची रितसर चौकशी करून कलम 354 व  पोस्को अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याच्या तक्रार अर्जाची दखल घेत राज्य महिला आयोगाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून सदर प्रकरण हे प्रथमदर्शनी गंभीर स्वरुपाचे व बालकांशी संबंधीत असल्याचे दिसून येते करीता नियमानुसार सदर प्रकरणाची चौकशी करुन या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन त्याचा अहवाल परस्पर संबंधितांना कळविण्यात यावा व त्याची एक प्रत या कार्यालयास देण्यात यावी असे पत्रात नमूद केले आहे.

या संबंधीत असलेल्या शाळेचे संस्था चालक व मुख्याध्यापक यांनी पीडित मुलीच्या घरच्यांवर दबाव आणून तक्रार न देण्याचे भाग पाडले अशी चर्चा शहरभर सुरू आहे. पण दुष्कर्म करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे या हेतूने एक तरुण पुढें आला आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राज्य महिला आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊन सत्य समोर येईलच. या कारवाईकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.