ठाण्याची रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली; १०० जणांवर केली कारवाई

थर्टी फर्स्ट साजरा करायला अमली पदार्थांचा वापर

ठाणे : थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या निमित्ताने पार्ट्या करणे, दारु पिऊन धांगडधिंगा करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे या गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी असे अनुचित प्रकार समोर येत राहतात. यंदा ललित पाटील आणि एल्विश यादव यांच्यामुळे ड्रग्जच्या केसेस आणि रेव्ह पार्टी सतत चर्चेत राहिली. त्यातच आता ठाण्यातून रेव्ह पार्टीचा प्रकार समोर आला आहे. ही रेव्ह पार्टी पोलिसांनी काल रात्री उधळून लावली आणि यात मद्यधुंद असलेल्या तब्बल १०० तरुणांवर कारवाई करण्यात आली.

नववर्षाचं स्वागत धुमधडाक्यात आणि आनंदाने करण्याऐवजी पार्ट्या करुन नशेत नववर्ष साजरं करण्याचं प्रमाण वाढलं आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसोबतच रेव्ह पार्ट्यांचंही आयोजन करण्यात येतं. अशीच एक रेव्ह पार्टी ठाणे पोलिसांनी उधळून लावली. ठाणे गुन्हे शाखा पोलिसांना या पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव्ह पार्टीवर धडक कारवाई करण्यात आली.

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते.

या रेव्ह पार्टीत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या १०० तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून मेडिकलसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेलं आहे.

ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत.