बिबट्यांवर विषप्रयोग:शेतकऱ्याचा ​ नियमित जामीन नामंजूर

मादी बिबट्याच्‍या गर्भातील तीन पिल्ल्‍यांचा देखील मृत्‍यू

औरंगाबाद ,१८ मार्च  /प्रतिनिधी :-विषारी औषधी टाकलेल्या बकरीच्‍या पिल्याला खाणाऱ्या ​ मादीसह नर बि​बट्याचा मृत्‍यू झाला. विशेष म्हणजे विषारी औषध टाकलेल्या बकरीच पिल्याला खाल्याने मादी बिबट्याच्‍या गर्भातील तीन पिल्ल्‍यांचा देखील मृत्‍यू झाल्याचे समोर आले आहे. प्रकरणात विष प्रयोग करणाऱ्या ​ शेतकऱ्याने नियमित जामीनासाठी सादर केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश डॉ. एम.एस. देशपांडे यांनी नामंजूर केला. ज्ञानेश्‍वर नंदलाल परदेशी (२९, रा. पिंप्री (माळेगाव) पो. जरंडी ता. सोयगाव) असे आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रकरणात २३ फेब्रुवारी रोजी जरंडी शिवारात शेतकरी सुखदेव काळु मोरे यांच्‍या गट क्रं.१५३ लगत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर मादी व नर बिबट्या गंभरी अवस्‍थेत पडून असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाने डॉक्टरांच्‍या पथकाला पाठवले. डॉक्टरांनी दोन्‍ही बिबट्यांना मृत घोषीत केले. बिबट्यांच्‍या शवविच्‍छेदना दरम्यान त्‍यावर विष प्रयोग झाल्याचे समोर आले. तपासादरम्यान ज्ञानेश्‍वर परदेशी याने विषप्रयोग करुन बिबट्यांना मारुन मोरे यांच्‍या शेताच्‍या बांधावर आणुन टाकल्याची माहिती वनविभागाच्‍या पथकाला मिळाली. त्‍यानूसार पथकाने ज्ञानेश्‍वर परदेशी याला ताब्यात चौकशी केली. चौकशी दरम्यान बिबट्या शेतीचे नुकसान करित असल्याने त्‍यावर विष प्रयोग करुन असे आरोपीचा काका बाबुसिंग रतन परदेशी याने आरोपी ज्ञानेश्‍वरला सांगितले होते. त्‍यानूसार ज्ञानेश्‍वर याने बकरीच्‍या पिल्लावर विषारी ओषध टाकले. व त्‍या पिल्लाचा फडशा बिबट्यांनी पाडला. त्‍यामूळे दोन्‍ही बिबट्या मरण पावले. दरम्यान मृत बिबट्याच्‍या शवविच्‍छेदनात मादी बिबट्याच्‍या गर्भात तीन पिल्ले  होते, विष प्रयोगामुळे ते देखील मरण पावल्याचा अहवाल डॉक्टरांकडून देण्‍यात आला. प्रकरणात सोयगाव वन‍विभागात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपी ज्ञानेश्‍वरला पोलिसांनी अटक केली मात्र गुन्‍हा दाखल झाल्यापासून आरोपीचा काका बाबुसिंग व त्‍याच्‍या साथीदार पसार आहेत. दरम्यान आरोपी ज्ञानेश्‍वरची पोलीस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली. त्‍यानंतर आरोपीने नियमित जामीनासाठी अर्ज सादर केला. अर्जाच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी घडलेला गुन्‍हा हा महाराष्‍ट्रातील ​दुर्मिळ  प्रकारातला आहे. गुन्‍ह्यातील आरोपीचे साथीदार पसार असून त्‍यांना अटक करायची आहे. आरोपीला जामीन दिल्यास तो तपासात अडथळा निर्माण करु शकतो त्‍यामुळे आरोपीला जामीन देण्‍यात येवू नये अशी विनंती न्‍यायालयाकडे केली.