देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी कार्य करा- उपराष्ट्रपतींचा विद्यार्थ्यांना सल्ला

उपराष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी शालेय विद्यार्थ्यांसोबत होळी केली साजरी

Image

नवी दिल्ली,१८ मार्च  /प्रतिनिधी :-उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज आपल्या निवासस्थानी शालेय विद्यार्थी आणि उपराष्ट्रपती सचिवालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत होळी साजरी केली. दिल्ली महानगरपालिकेच्या शाळांसह, एकूण चार शाळेतील विद्यार्थ्यांनी आज उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्साही विद्यार्थ्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला.

Image

यावेळी मुलांनी उपराष्ट्रपतींशी संवादही साधला. “तुम्हाला कधी निराश झाल्यासारखे वाटते का?” असे मुलांनी विचारले असता, राष्ट्रपती म्हणाले की त्यांना निराश वाटत नाही, मात्र जेव्हा कधी संसद सदस्य, सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळणारे वर्तन करत नाहीत, तेव्हा आपला भ्रमनिरास होतो, असे उत्तर उपराष्ट्रपतींनी दिले. त्यांच्या दृढ इच्छाशक्तीच्या मागे, त्यांचे प्रेरणास्त्रोत सरदार पटेल आहेत, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.

Image

आपली कार्यालयीन कर्तव्ये आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळतांना समतोल कसा राखतात, असे विचारले असता त्यावर नायडू म्हणाले की,  “ज्यावेळी मी राजकीय जीवनात अत्यंत व्यस्त होतो, त्यावेळी कुटुंबियांसाठी फारसा वेळ देऊ शकत नव्हतो, पण आता उपराष्ट्रपती झाल्यावर मी माझ्या कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करतो. “उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती म्हणून माझी घटनात्मक कर्तव्ये आहेत. मात्र, त्यातूनही मी माझ्या नातवंडांना वेळ देण्याचा प्रयत्न करतो. “ असे त्यांनी सांगितले.

Image

आपली माता, मातृभूमी आणि मातृभाषेवर कायम प्रेम करा, मनात आदराची भावना असूद्या, असा उपदेश त्यांनी केला. ‘देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी कायम जगा आणि प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.आपली प्राचीन सांस्कृतिक मूल्ये अधोरेखित करत, एकमेकांना  मदत करणे, तसेच एकमेकांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी मुलांना केले. आपल्यामध्ये करुणेची भावना वृद्धिंगत होऊ दया. असेही ते म्हणाले.

त्या आधी, राष्ट्रपती राम नाथ कोविन्द आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी परस्परांना दूरध्वनीवरुन होळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपराष्ट्रपतींना होळीच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत.