वैजापुरात गाडीची काच फोडून डिक्कीतून 13 लाख पळवले

वैजापूर, १४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-चारचाकी वाहनाची काच फोडुन डिक्कीमध्ये ठेवलेली तेरा लाख तीन हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास शहरातील लाडगाव रस्त्यावर हॉस्पिटलच्या परिसरात घडली. दुसऱ्या एका घटनेत मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली रक्कमही लंपास झाल्याची घटना उघडकिस आली आहे. 

दरम्यान एकाच दिवशी या घटना घडल्याने दोन्ही घटनांमधील चोरटे एकच असावेत असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि औरंगाबाद येथील गारखेडा परिसर भागात राहणारे मधुकर गोविंदराव व्यापारी हे सेवानिवृतृत इंजिनिअर असून त्यांचा मुलगा योगेश हा डॉक्टर आहे. त्याच्या हॉस्पिटलचे बांधकाम औरंगाबाद येथे सुरु असल्याने त्यांना बांधकामासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी वैजापूर तालुक्यातील बोरसर येथे राहत असलेल्या त्यांच्या साडुचा मुलगा गणेश अशोक मोरे यांच्याकडे तेरा लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार गणेश याने मधुकर मापारी यांना पैसे घेण्यासाठी सोमवारी वैजापूर येथे बोलावले.‌ मधुकर हे आई, वडील व पत्नीला सोबत घेऊन वैजापुरला आले.‌ वडीलांचे वैजापूर पंचायत समितीत काम असल्याने त्यांनी आई वडीलांना शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळ सोडले. दरम्यान, मधुकर यांनी गणेश मोरे यास फोन केला असता त्याने बॅकेतून पैसे काढले असून आपण येवला रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपासमोर असल्याचे सांगितले. त्याठिकाणी पोहचल्यावर गणेश याने तेरा लाख तीन हजार रुपयांची रक्कम असलेल्या दोन पिशव्या मधूकर यांना दिल्या. त्यांनी तेरा लाख तीन हजार रुपयांची रक्कम असलेल्या दोन पिशव्या. चारचाकी वाहनांच्या डिक्कीमध्ये ठेवल्या व नंतर त्यांचा भाऊ सुधाकर मापारी यांना भेटण्यासाठी लाडगाव रस्यावरील चिरंजीवी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी त्यांची कार मोहन हॉस्पिटलजवळ उभी केली होती. सुधाकर यांना भेटून आल्यानंतर बाहेर आले असता मधुकर यांना गाडीची समोरची काच फुटलेली आढळून आली.‌ गाडीच्या डिकीमधील पैशांच्या दोन पिशव्या ही गायब झाल्या होत्या.‌ दरम्यान सलीम भंगारवाला यांच्या दुचाकीमधूनही काही रक्कम चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली.‌ दरम्यान, या प्रकरणी मधुकर माघारी यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत हे करीत आहेत.