जी-20 शिखर परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

औरंगाबाद,१४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- देशात पुढील वर्षी होत असलेल्या जी-20 या राष्ट्रसमुहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात औरंगाबादचाही सहभाग असणार आहे. जी-20 मध्ये सहभागी प्रतिनिधी 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद येथील विविध स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज आढावा घेतला. 

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनासाठी पूर्वतयारी बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.

जी-20 परिषदेचे सहभागी प्रतिनिधी 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत. वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. जगभरातील सुमारे 500 प्रतिनिधी औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी आढावा घेतला. या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबाद शहराची आकर्षक पद्धतीने प्रतिमा निर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी या परिषदे संदर्भात केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.