‘नॅक’ मानांकनाबद्दल राज्य सरकारकडून देवगिरी महाविद्यालयाचा गौरव

औरंगाबाद,१२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयास नुकतेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेची (नॅक) ‘A++’ श्रेणीसह 3.59 गुण मिळाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून देवगिरी महाविद्यालयाचा शुक्रवारी मुंबई येथे गौरव करण्यात आला.

          महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण विभाग, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रूसा) व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ‘नॅक’ न झालेल्या महाविद्यालयांसाठी शुक्रवारी मुंबई विद्यापीठात एकदिवसीय ‘वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले होते. चतुर्थ ‘सायकल’मध्ये ‘नॅक’ची ‘A++’ ही उच्च श्रेणी प्राप्त करणारे देवगिरी महाविद्यालय देशातील पहिल्या पाच क्रमांकामध्ये तर राज्यातील प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय ठरले. या उल्लेखनीय मानांकनाबद्दल राज्य सरकारने दखल घेत सदरील ‘वर्कशॉप’मध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बेंगलुरू (कर्नाटक) येथील ‘नॅक’चे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांच्या हस्ते देवगिरी महाविद्यालयाचा विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी मशिप्र मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके, देवगिरी महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर, ‘आयक्यूएसी’ समनव्यक डॉ.विष्णु पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

          याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे असेल तर सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक’ला सामोरे गेले पाहिजे. राज्यातील बहुसंख्य विनाअनुदानित महाविद्यालय अद्यापही ‘नॅक’ला सामोरे गेलेले नाहीत, ही बाब प्रगत समजल्या जाणार्‍या आपल्या महाराष्ट्रासाठी हितावह नाही. त्यामुळे आगामी काळात सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’ला सामोरे जावेच लागेल. तसे निर्देश देखील संबंधितांना दिले असल्याचे ते म्हणाले. तर ‘नॅक’चे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले की, ‘नॅक’ची प्रक्रिया आता सुटसुटीत केलेली असून सर्वच महाविद्यालयांनी ‘नॅक’ला सामोरे जावून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी काम करावे. 

याप्रसंगी उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव विकास रस्तोगी, रूसाचे सचिव विपूल विनायक, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.डी.आर.माने, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के तसेच राज्यातील विविध शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.