राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आदित्य ठाकरेंचा सहभाग

हिंगोली ,११ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. शुक्रवारी यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे हिंगोलीमध्ये सहभागी झाले होते. शिवसेनेने काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी, देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, असे ट्विट त्यांनी केले.भारत जोडो यात्रेत हे दोन युवराज एकत्र दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही लेक्षवेधी घडामोड ठरली आहे.

“भारत जोडो यात्रेला प्रतिसाद चांगला आहे. माझ्यासोबत अनेक शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले आहेत. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. खासदार संजय राऊत यांच्या जामिनावरील निकालपत्रावरून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे दिसते. देशात लोकशाही उरली नाही. राज्य सरकारला शिवी देणार मंत्री अब्दुल सत्तार चालतात, बंदूक काढणारे चालतात.” अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.आदित्य ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे पदयात्रेत सामील होते. 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते विश्वजित कदमदेखील यात्रेत सहभागी झाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांनी वाद्ये वाजवत यात्रेचे स्वागत केले. खास लातूर येथून आणलेला गजराज ही यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यात्रेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. हिंगोली जिल्हा सीमेवर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

आज भारत जोडो यात्रा हिंगोलीत दाखल झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी यांनी राहुल गांधीसह या यात्रेत सहभाग घेत पदयात्रा केली. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे आणखी काही नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यासह तब्बल 8 किली मीटर पदयात्रा केली.या दोन्ही नेत्यांमध्ये 30 ते 35 मिनीटे चर्चा झाल्याचेही समजते. भारत जोडो यात्रा काँग्रेसची असली तरी महाविकास आघडीचे नेते याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र, या भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सहभाग लक्षवेधी ठरत आहे.