‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार

मुंबई,६​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित अर्थात ‘महाप्रित’ने केंद्र शासनाच्या पुणे नॉलेज क्लस्टरशी सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारांतर्गत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनअंतर्गत ग्रीन हायड्रोजन व्हॅली प्रकल्प (एच.व्ही.पी.) मध्ये सहयोग, सहकार्य आणि अभिसरण या क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे.

यावेळी एन.सी.एल.चे संचालक, ए.आर.ए.आय.चे संचालक, आघारकर संशोधन संस्था, केंद्र शासनाच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार तसेच ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ञ उद्योजक उपस्थित होते. महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या नेतृत्वाखाली महाप्रित सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे.

महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन क्लस्टर स्थापित करण्याच्या दृष्टीने महाप्रितने जर्मनीतील तंत्रज्ञान हस्तांतरण आणि प्रशिक्षण संस्थेचा भाग असलेल्या स्टीनबीस या कंपनीच्या “स्टीनबीस (भारत)” या भारतीय शाखेसोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे.

महाप्रित ग्रीन हायड्रोजन ऍप्लिकेशन टेक्नॉलॉजीज, साठवणूक आणि वाहतूक तंत्रज्ञान (स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजीज) आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील उद्योग भागीदारांसाठी स्वारस्याची अभियोक्ती (‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’) प्रसिध्द करण्याच्या प्रक्रियेवर भर देत आहे.