सध्याचे राज्यकर्ते कुठे आहेत आणि काय करतायेत असा प्रश्न -अवघ्या 3 मिनिटाच्या भाषणात शरद पवारांनी पुन्हा जिंकले 

आजारपणातही शरद पवार मैदानात,रुग्णालयातून थेट कार्यकर्त्यांमध्ये

शिर्डी ,५ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरासाठी ते रुग्णालयातून थेट उपस्थित राहिले. शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे. मात्र अशाही परिस्थितीत ते मेळाव्यासाठी उपस्थित राहिले. पवारांचा आवाज बसला आहे. मात्र तरीही ते बोलण्याचा प्रयत्न करीत होते. अतिशय शिस्तबद्ध वैचारिक शक्ती देणा-या शिबीराचे आयोजन केले अशी त्यांनी भाषणाची सुरुवात केली.या शिबिरात शरद पवारांची उपस्थिती व त्यांचे भाषणाने सर्वांना नवचैतन्य व ऊर्जा दिली.पवारांचा असाच उत्साह, कार्यकर्त्यांप्रती तळमळ पुन्हा एकदा दिसली. शरद पवार 6 दिवसांपासून म्हणजे 31 ऑक्टोबरपासून आजारी आहेत, मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्याही अवस्थेत पवारांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीत सुरु असणा-या मंथन शिबिराला हजेरी लावली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ या शिबिरास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचेआभार व्यक्त करतो की, त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना या शिबिराच्या माध्यमातून एक वैचारिक शक्ती देण्याचे काम केले. राज्यभरातून युवक, महिला तसेच सामाजातील लहान घटकांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या शिबिरामध्ये येयची इच्छा होती. परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र्य शिबिर घेण्याचा निर्णय जयंतराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. मला खात्री आहे की, तो उपक्रम देखील यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील व राज्यातील सध्य परिस्थितीबाबात शरद पवार यांनी अत्यंत मार्मिक भाष्य केले. प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीकडे अशी सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकता असावयास हवी. परंतु दुर्दैवाने सध्या तसे दिसत नाही. एका राज्यातील प्रकल्प दूसऱ्या राज्याकडे घालवण्यात येत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन नंतर टाटा-एअरबस सारखा भव्य प्रकल्प राज्यातून गुजरातकडे वळवण्यात आला. राज्यातील सध्याच्या सरकारच्या डोळयादेखत हे प्रकल्प गेले ही लाजीरवाणी गोष्ट आहे.

राज्यातील आणि देशातील नेतृत्वाने यापासून बोध घ्यायला हवा की विकास घडवायचा असेल तर मर्यादीत विचार करायचा नसतो. देशातील महिला, कष्टकरी, शेतकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांमध्ये देशाला समृद्ध करण्याची धमक आहे. मात्र त्यांना प्रोत्साहित करणारे सत्ता, धर्म, जात, पक्ष यांच्या पलिकडे जाऊन विचार करणारे नेतृत्व हवे. अशी विशालदृष्टी देशातील आणि राज्यातील नेतृत्वांमध्ये नाही.

महाराष्ट्रापूरता विचार करावयाचा झाल्यास सध्याचे राज्यकर्ते कुठे आहेत आणि काय करतायेत असा प्रश्न पडतो. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या अनेक प्रसंगी व अनेक गोष्टींवर होणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांचा विचार संकुचित स्वरूपाचा आहे हे प्रकर्षाने दिसून येते. हे चित्र समाधानकारक नाही. सध्या राज्यात अतिवृष्टी ओला दुष्काळामुळे शेतकरी व जनता हवालदिल झाली आहे. दैनंदिन वृत्तपत्रांतून आणि माध्यमातून सातत्याने त्यांचे प्रश्न मांडले जात आहेत. पण त्या प्रश्नांकडे सध्याचे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्र एक विचार, एक संस्कृती आहे. परंतु संकुचित विचारांचे राज्यकर्ते सत्तेवर आल्यावर राज्य अधोगतीला जाऊ शकते. परंतु काही झाले तरी तसे होऊ द्यायचे नाही हे आपणासमोर आव्हान आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी, शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लहानसहान कार्यकर्ते एकसंध झाल्यानंतर देशातील सांप्रदायिक विद्वेशाचे चित्र बदलू शकते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून पुरोगामी विचाराची पेरणी करून नवीन युवा पिढी तयार करणे व त्यातून एक मजबूत व विधायक नेतृत्वाचा संच तयार करणे ही राष्ट्रवादी पक्षातील सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. उद्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि दोन वर्षांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यात यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस चित्र बदलू शकते. चला तर आपण कंबर कसून कामाला लागू या ! माझे सहकार्य आणि सदिच्छा आपल्या पाठिशी आहेतच.

शिर्डी येथे हे भव्य शिबीर आयोजित केल्याबद्दल सर्वश्री प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ आदी नेते, पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पवार यांनी मनापासून कौतुक केले. ह्या विचारमंथनात सहभागी झालेला प्रत्येकजण परत जाताना नवी उर्जा घेऊन जाईल आणि परिवर्तनाच्या कार्यात झोकून देईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.