मंत्र्यांना चिखलात बुडवून बाहेर काढल्यावर ओला दुष्काळ जाहीर करणार का?-उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

औरंगाबाद,२३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या गावांना भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी देखील केली. उद्धव ठाकरे यांना सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. हे सरकार बेदरकार आहे, ओला दुष्काळ जाहीर करणार नाही मात्र किमान तात्काळ मदत कशी देता येईल याचा तरी विचार करावा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. ओला दुष्काळाच्या (wet drought) निकषावरुन उद्धव ठाकरे भाष्य केले. मंत्र्यांना चिखलात बुडवून बाहेर काढल्यावर ओला दुष्काळ जाहीर होईल का? असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला

“आजची भेट प्रतिकात्मक आहे. इथे विचित्र अवस्था आहे. दिवाळी सुरुय आणि इकडे शेतकऱ्याचं दिवाळ निघालं आहे. मी विरोधी पक्षात आहे म्हणून नाही तर बळीराजाचे माझ्यावर ऋण आहेत म्हणून मी आलो आहे. लॉकडाउन मध्ये अर्थ व्यवस्थेला बळीराजाने आधार दिला.  पुण्यात रस्ते तुंबले त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही आताही असेच काही म्हणतील. बळीराजा ऊघड्यावर पडू नये ही सरकारची जबाबदारी आहे.मात्र या निर्दयी सरकारकडे भावनांचा अभाव आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसल्याची टीका वारंवार भाजप आणि शिंदेंच्या आमदार-खासदारांकडून केली जाते, यावरही उद्धव ठाकरेंनी पलटवार केला.

‘आम्ही त्यावेळी वाढवून मदत केली होती, त्यावेळी नीती आयोगासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक झाली होती. मी माझ्या घरी आणि पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी बसून होते. आम्ही घरी बसूनच काम केलं होतं. जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. मी आणि पंतप्रधानांनी घरात बसूनच तेव्हा काम केलं होकतं. एनडीआरएफच्या निकशापेक्षा जास्त मदत दिली होती. हे निकष बदलले पाहिजेत,’ असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे :

एका बाजूला दिवाळी सुरू आहे नि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं दिवाळं निघालं आहे. दिवाळी साजरी तर सोडून द्या. दिवाळीत कपडे कोणते घालायचे, अन्न काय शिजवणार हा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे.

विरोधी पक्ष म्हणून आलेलो नाही. या शेतकऱ्याचं ऋण आपल्यावर आहे. कोरोना काळात आपल्या अर्थव्यवस्थेला या अन्नदात्याने आधार दिलेला आहे. कृषी क्षेत्राने दिलेला आहे. शेतकरी तेव्हा राबला नसता तर आपल्या आर्थिक स्थितीचेही दिवाळे निघाले असते.

हल्ली जे बदलत वातावरण आहे त्यात पावसाळ्याची सुरुवात चक्रीवादळाने होते. त्यानंतर सतत धार, अतिवृष्टी, ढगफुटी होतात. गेल्या आठ दहा दिवसांत पुण्यामध्येही अतोनात पाऊस झाला. रस्ते तुंबले, घरात पाणी शिरले. त्यावर आपले उपमुख्यमंत्री म्हणाले, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. तसंच चिखल झाला आहे, सर्वत्र पाणी झाले आहे हे पाहून ते म्हणतील जसे शहरात पाऊस किती पडावा हे महापालिकेच्या हातात नसतं तसेच गावात, खेड्यात पाऊस किती पडणार हे सरकारच्या हातात नसतं.

अस्मानी संकट आल्यावर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचं नाही. त्याचं घरदार उघड्यावर पडता कामा नये. आज घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेन या कोरड्या सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे.

हे उत्सवी सरकार आहे. उत्सव मग्न सरकार. हा उत्सव तो उत्सव… उत्सव साजरे करा पण आपल्या राज्याची जनता समाधानी आहे की नाही, हे पाहणं त्या त्या राज्यकर्त्यांच, राज्य सरकारच काम आहे आणि हे सरकार त्यात अपयशी ठरत आहे.

ओला दुष्काळ नसल्याचं हे सरकार म्हणत आहे. त्यामुळे मी पाहणी करण्यासाठी आलो आहे. ही माझी प्रतीकात्मक भेट आहे. खरं काय खोटं काय ते तुमच्या माध्यमातून सरकारलाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेला, देशाला कळू द्या.

काही शेतकऱ्यांनी मला आता सांगितलं की त्यांच्याकडे रेशन घ्यायलाही पैसे नाहीत. तुम्ही जो शिधा वाटप करताहेत तो देखील शेकऱ्यांकडूनच येतोय. पण तो शिधा वाटपही होत नाहीय. त्यात घोटाळा झालाय, नाही झालाय हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

साधारणतः पन्नास हजार रुपये हेक्टर, अशी शेतकऱ्याची मागणी आहे आणि ती मागणी त्यांच्यावतीने मी सरकारकडे करत आहे. ही मनातली नाही जनातली मागणी आहे.

पंचनामे कधी करणार? ते झाल्यानंतर तुमचे लंगडे घोडे दामटवणार… त्यात त्यांचं आयुष्य बरबाद होतंय.

ओला दुष्काळ जाहीर करा किंवा नका करू. माझ्या शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे. त्यांनी केलेल्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.

शिवसेना सतत आणि सतत तुमच्यासोबत आहे. मविआतले मित्र पक्षही आहेत. काळजी करू नका. धीर सोडू नका. काही करून आत्महत्येचा विचारही मनात आणू नका.

शेतकऱ्यांनी आता त्यांच्या हातातील आसूड आता वापरायला हवा. तो तुमच्याच हातात शोभून दिसतो. उगाच आम्ही हातात घ्यायचं नि फॅशन म्हणून फोटो काढायचा? तुम्ही दगडालाही पाझर फोडू शकता तर मग सरकारला का नाही. सरकारला घाम फुटला पाहिजे.

ज्यांना घरामध्ये सगळं दिल्यानंतरही घर सोडून बाहेर फिरताहेत, त्यांना शेतकऱ्याच्या घरातलं दुःख कसं काय कळणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखल, विमानतळावर कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

शेतकऱ्यांशी देखील गद्दारी करणारं हे सरकार आहे.

मी आणि पंतप्रधानांनीही त्या काळात घरात बसूनच काम केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या मिटिंगमध्ये आम्ही एनडीआरएफने दिलेल्या निकषाबद्दलही बोललो होतो. त्यांनी दिलेल्या निकषांपेक्षा अधिक मदत आम्ही त्यावेळी केली होती.

नीती आयोगाच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा सतत मांडला होता. एनडीआरएफचे जुने निकष बदलायला हवेत. तसेच पीक विमा योजनेंतर्गत बीड पॅटर्न अमलात आणण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत होतो. आता हे सरकार पाठपुरावा या हंगामात होणार कि पुढच्या हंगामात ते शेतकऱ्यांना कळलं पाहिजे.

मी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा माणूस म्हणून, त्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेन.