विना मास्क ग्रामस्थांना दंड

कोरोनावर नियंत्रणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Image may contain: one or more people, people standing and outdoor

पीक कापणी प्रयोगाचे पर्यवेक्षण
• विना मास्क ग्रामस्थांना दंड
• शेडनेट हाऊसची केली पाहणी
• गंगापूर, वैजापुरात कोविड केंद्रांची पाहणी व आढावा बैठका

औरंगाबाद दिनांक 26 – कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय योजिन्यात यावेत, यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व सकारात्मकरीत्या प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले.
दहेगाव बंगला येथे पीक कापनी प्रयोग पर्यवेक्षण, गंगापूर आणि वैजापूर येथील कोविड केअर केंद्रे, आरोग्य उपकेन्द्रे, उपजिल्हा रुग्णालय आदींची पाहणी करून श्री चव्हाण यांनी गंगापूर तहसील कार्यालय, वैजापूर तालुक्यातील वैजापूर पंचायत समिती कार्यालयात सर्व अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी पी.आर.जाधव, प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, तहसीलदार अविनाश शिंगोटे आदींसह महसूल, कृषी, जिल्हा परिषद विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकींमध्ये कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील सर्व टीम आरोग्यदायी असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व यंत्रणातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतःसह सर्व नागरिकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासकीय कार्यालये, कोविड केअर सेंटरमध्ये कराव्यात. शासकीय कार्यालयांत पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, वाफ घेण्यासाठी यंत्रे लावावीत. जागोजागी हात धुण्याची व्यवस्था करावी, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी अग्रक्रम ठेवावा. गाव, तालुका पातळीवरील बाजारांमध्ये अँटीजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, खाजगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स, सर्व यंत्रणांतील अधिकारी, माध्यमकर्मी यांना विश्वासात घ्यावे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून त्यांना मास्कचे महत्त्व पटवून द्यावे. मास्क हीच सध्याची लस आहे, हे जनतेला पटवून सांगावे. तालुका ठिकाणी व गाव पातळीवरील प्रत्येक व्यापारी व्यावसायिक, फिरते व्यावसायिक, भाजी विक्रेते आदी व्यापार्‍यांची चाचणी करण्यास प्राधान्य द्यावे. बहुतांश लोक बरे झाले आहेत, परंतु बरे होण्याचा दर अधिक चांगला असला तरी या आजाराबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. कोरोना या संकटकाळात सर्व यंत्रणेने अधिक सजग राहून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल. ज्यांचे काम उत्तम आहे त्यांची दखलही घेण्यात येईल, असे यावेळी श्री.चव्हाण म्हणाले.
श्री. गोंदवले यांनी सर्व यंत्रणांनी डेटा इंट्री वेळेत करावी, डेटा एन्ट्री वेळेवर न केल्यामुळे शासनाच्या पोर्टलवर दिसणारे आकडे संभ्रमीत करणारे असल्याचे निदर्शनास येते, त्यामुळे इंट्री करण्यास प्राधान्य असावे. वैजापुरात अचानकपणे रुग्णसंख्या वाढते व घटते, त्यामुळे येथील यंत्रणेने अधिक सजग राहून रुग्णांची काळजी घ्यावी. तसेच तालुका पातळीवरील रुग्ण त्यांच्यावरील उपचार शक्यतो याच ठिकाणी व्हावा, जेणेकरून शहरातील घाटी व इतर खाजगी इस्पितळावर अधिक भार पडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.
पीक कापणी प्रयोग पर्यवेक्षण
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथील शेतकरी आप्पासाहेब घुसाळे यांच्या शेतात पीक कापणी प्रयोगाचे प्रत्यक्ष पर्यवेक्षण करत मार्गदर्शन केले.
विना मास्क असलेल्यांना दंड

Image may contain: one or more people, people standing, tree, outdoor and nature


गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे पीक कापणी प्रयोगास उपस्थित असलेले पोलीस पाटील लक्ष्मण तांबे, सरपंच अर्जुन घुसाळे, अप्पासाहेब घुसाळे, विस्तार अधिकारी प्रतिभा कांबळे आदींसह काही ग्रामस्थांनी मास्क न वापरल्याने पाचशे रुपये दंड करत व मास्कचे महत्व पटवून देत श्री.चव्हाण यांनी त्यांना मास्क दिले. तसेच आपणही इतरांना मास्क परिधान करण्याबाबत जागृत करावे, असे आवाहन केले. त्यानंतर दहेगाव बंगला येथील गणेश घुसाळे यांच्या शेडनेट हाऊसमधील शिमला मिरची लागवडीची पाहणी त्यांनी केली. श्री घुसाळे यांना इतर तरुणांनाही या लागवडीबाबत प्रशिक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *