ते गेले त्यांनी पाहिलं काय समजलं माहीत नाही:ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर शिंदे गटाचा प्रहार

मुंबई ,२३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला.

‘ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, कारण त्यांचा हा दौरा तासभरच होता. शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले होते, त्यांना बटाटे जमिनीवर लागतात का जमिनीखाली हे माहिती नाही. त्यांना शेतीतील काय कळणार? असे सूचक उद्गार पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल काढले होते,’ असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.

‘बांद्र्यावरून ते बांधावर कधी पोहोचले कळलंच नाही. याआधी कधी मातोश्रीमधून, वर्षामधून बाहेर पडलेत का? मुख्यमंत्री असताना 25 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देतो म्हणाले होते, पण याआधी कधी ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले का?’ असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला.