शेतकऱ्यांना दिलासा; मान्सूनची राज्यातून माघार

मुंबई : राज्यात मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने आज निरोप घेतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही.

यंदा पावसाने जून ते ऑक्टोबर असा चार महिने मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या २४ तासांत कोकणातील एक दोन ठिकाणे वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद नाही.

परतीचा पाऊस आणखी किती दिवस पडणार याची चिंता शेतकऱ्याला होती. मात्र मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सीतरंग चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा फटका ओडीशा आणि बंगाल या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने सांगितले आहे.