ग्रामीण भागातील रुग्‍ण वाढ रोखा !-पालकमंत्र्यांचे निर्देश

औरंगाबाद दि. 14 –   औरंगाबाद जिल्ह्यातील 308 गावांमध्ये रुग्ण आढळले असून, ग्रामीण भागात 19 प्रतिबंधित क्षेत्रे घोषीत करण्यात आली आहे. याची गंभीर नोंद घेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासनाला अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यासाठी एका रुग्णामागे त्याच्या संपर्कात आलेल्या किमान 15 व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी करा. चाचण्यांची संख्या वाढवा. अँटीजेन  चाचणीची किटस् शासनाने उपलब्ध‍ करुन दिली आहेत त्यांचा वापर करा. ताप तपासणी केंद्रे वाढवा. अशा सर्व उपायांनी कोरोनाचा ग्रामीण भागातील प्रसार रोखलाच पाहिजे असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

Displaying 2.jpeg

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद जिल्हा कोविड – 19 च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी प्र.जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, महानगरपालिकेचे आयुक्त  आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुंदर कुलकर्णी ,महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर आदीची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याकरिता ॲण्टिजेन तपासणीची संख्या वाढवावी, हायरिस्क असणाऱ्या लोकांचे कॉन्टॅक्ट मॅपीग करावे, फिवर क्लिनीकची संख्या वाढविण्याच्या सूचना संबंधितांना देऊन श्री. देसाई म्हणाले, की ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन  रुग्ण गावातच कसा बरा होईल याकरिता स्थानिक पातळीवरच उपचार करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास आपसूकच शहरी रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येणारा ताण कमी होईल, ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर अधिक अद्यावत करुन गावाच्या सीमेवरच तपासणी झाली पाहिजे, जेणेकरून रुग्णवाढीच्या प्रसारास प्रतिबंध करता येईल. औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावातील गावकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने गावबंद करुन बाहेरुन येणाऱ्यास प्रतिबंध केला आहे, परिणामी रुग्णसाखळी तोडण्यास यश मिळाले आहे. याचा इतर गावांनी आदर्श घेऊन स्वयंस्फुर्तीने शिस्त पाळण्याचे देखील आवाहन यावेळी श्री. देसाई यांनी केले. राज्याच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास औरंगाबाद जिल्हा हा ॲण्टीजेन टेस्ट करण्यात दुसऱ्या क्रमांकावर असून मृत्यूदराचे प्रमाण बाराव्या क्रमांकावर आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 12.65 टक्के इतके आहे. तर डबलींग रेट हा शहराचा 34 दिवसांचा आहे. रुग्णवाढीचा दर 20 टक्के इतका असल्याची माहिती देवून पालकमंत्री  श्री. देसाई म्हणाले की, ग्रामीण भागातील कोरोनाच्या प्रतिबंधाकरीता डॉक्टर, नर्स आदी मनुष्यबळाची कमतरता भासू नये याकरीता निधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही अश्वासन श्री. देसाई यांनी दिले. सतत गेल्या पाच महिन्यापासून सर्व कोरोना योध्दे रुग्णसंख्या कमी करण्याकरिता झटत आहेत. त्यामुळे कामात शिथिलता येऊ शकते. परंतू तसे होऊ न देता अधिक दक्षता घेण्याचेही निर्देश यावेळी सर्व संबंधिंत विभाग प्रमुखांना  पालकमंत्री देसाई यांनी दिले .

यावेळी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय म्हणाले की औरंगाबाद शहरात रुग्णसंख्या वाढीचा दर कमी झाला असून राज्यातील महानगरपालिकेच्या तुलनेत औरंगाबादमधील महानगरपालिका ही ॲण्टीजेन टेस्टमध्ये प्रथम क्रमांकावर असून आत्तापर्यत 14 हजार टेस्ट झाल्या आहेत. तसेच  रुग्णांच्या मृत्यूदरात देखील घट झाली आहे. तसेच शहरात तरुण युवकांच्या टास्कफोर्सव्दारे हायरिक्स मधील लोकांचे कॉन्टेक्ट मॅपीगव्दारे रुग्णवाढीस आळा घालण्यात आला आहे. तसेच 24 तास सेवा उपलबध असलेल्या वॉररुमव्दारे रुग्ण दवाखाण्यात भरती करुन घेण्यापासून ते डाटाइट्री करण्यापर्यंत सर्व कामे या वॉररुममध्ये करण्यात येत आहे. तसेच  16 हजार मोबाईल फीवर क्लिनिक कार्यरत असून शहरातील दूध, किराना,भाजीविक्रेते, आदींच्या ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढीस प्रतिबंध करण्यात आला असून हे मॉडेल केंद्राने इतर राज्यांना लागू करण्याकरिता प्रोत्साहित केले आहे. अशी माहिती श्री. पांडेय यांनी यावेळी देऊन शहरात घाटी येथे प्लाझमा थेरपी सुरु करण्यात आली आहे तर सेरो सर्वेक्षणासही सुरुवात झाली असून 4 हजार 500 सॅम्पलची तपासणी करण्यात येणार  असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपाच्या आरोग्य अधिकारी निता पाडळकर यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.

शहरवासियांच्या सुविधा मोठ्याप्रमाणावर वाढणार

औरंगाबाद शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हॉकर्स, पार्किंग झोन, शहर पथ विक्रेत्यांच्या नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ आज उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते झाला. या नोंदणीची सुरूवात 25 पथकांद्वारे 17 ऑगस्टपासून सुरू होऊन 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ॲपचे उद्घाटन श्री.देसाई यांच्याहस्ते झाले. तत्पूर्वी  जिल्ह्यातील  विविध प्रश्नांचा, तसेच शहरातील  विविध विकासकामांचा आढावा श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

हॉकर्स, पार्किंग झोन, शहर पथ विक्रेत्यांच्या नोंदणी प्रक्रिया व ॲपबाबत मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सविस्तर माहिती पालकमंत्री श्री. देसाई यांना दिली.  या नोंदणीसाठी गुगल अर्थच्या साहाय्याने शहरातील  विविध हॉकर्स, पार्किंग झोनचे, शहर पथ विक्रेत्यांची नोंदणी शहरातील नऊ झोनमध्ये 25 पथकात प्रत्येकी पाच कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने राबविण्यात येणार आहे. या पथकात दोन माजी सैनिक, दोन ऑपरेटर व एक सर्वेक्षक असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरातील जंगल सफारी पार्क, ई गव्हर्नन्स या प्रकल्पांबाबतचाही सविस्तर आढावा श्री.देसाई यांनी घेतला. यावेळी श्री. पांडेय यांनी सफारी पार्क हा एकूण अंदाजे 147 कोटींचा प्रकल्प मिटमिटा येथे प्रस्तावित आहे. या जंगल सफारी पार्कसाठी केंद्र सरकारच्यावतीने 50 टक्के, राज्य सरकारच्यावतीने 25 आणि मनपा 25 टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे. अंदाजित 85 एकरात हा पार्क उभारण्यात येणार असून यामध्ये मराठवाड्यासह देशातील व परदेशातील प्राणी, पक्षी यांचा समावेश असणार आहे.

तसेच शहराच्या नागरिकांसाठी सुविधांयुक्त ठरणाऱ्या मनपाच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पपूर्तीनंतर सुमारे 126 प्रमाणपत्रे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होतील, असे आयुक्त श्री. पांडेय यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे कर व्यवस्थापन सुरळीत होऊन कर वसुलीतही वाढ होण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल. या प्रकल्पांतर्गत युनिकोड, नेटवर्किंग, सर्व विभाग, कार्यालये एकमेकांशी जोडली जातील, त्यामुळे मनपाची सर्व खाती तंत्रज्ञानयुक्त होऊन नागरिकांना वेळेत सुविधा मिळेल. त्यामुळे प्रशासन नागरिक स्नेही होऊन महसुलात वाढ होण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल. त्याचबरोबर या प्रकल्पाच्यामाध्यमातून शहरातील प्रत्येक मिळकतीला स्वतंत्र ओळख क्रमांकही देण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यावर महापालिकेने  भर द्यावा, असे निर्देशही श्री. देसाई यांनी दिले. 

यावेळी श्री. पांडेय यांनी शहरातील  विविध विकासकामे यांबाबत श्री.देसाई यांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात येणारे महापुरूषांचे पुतळे, संत एकनाथ रंग मंदिराचे सुशोभीकरण, पाणी पुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, अमृत योजना, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आदींचा समावेश होता. या बाबींचाही सविस्तर आढावा श्री. देसाई यांनी घेऊन योग्य त्या सूचना केल्या.  या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त वर्षा ठाकूर, अतिरिक्त मनपा आयुक्त बप्पासाहेब नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, मनपाचे सर्व विभागप्रमुख आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती आहेत.

जिल्ह्यातील प्रश्न तत्काळ सोडवा : देसाई

पीक कर्ज, खतांची मागणी, बियाणे विक्री, मका खरेदी आदी प्रश्नांबाबत श्री.देसाई यांनी संबंधित विभागाकडून आढावा घेतला. यामध्ये  अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी जिल्ह्यात ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 152 टक्के अधिक पीक कर्जाची  रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी जिल्ह्यातील खते, बियाणे यांची माहिती दिली. मका खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना थकबाकी लवकर मिळावी यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना श्री. देसाई यांनी संबंधितांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *