अनिल अग्रहारकर यांना आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी प्रॉपर्टी डीलर भागवत यशवंत चव्हाणला पोलिस कोठडी

औरंगाबाद,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-उल्कानगरी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक  अनिल अग्रहारकर यांना आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी प्रॉपर्टी डीलर भागवत यशवंत चव्हाण (६४, रा. शिवदत्त हौसिंग सोसायटी, एन-८, सिडको) याला मंगळवारपर्यंत दि.१८ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी रविवारी दि.१६ दिले.

बांधकाम व्यावसायिक  अनिल अग्रहारकर आत्‍महत्या प्रकरणी शनिवारी दि.१५ दुपारी पोलिसांनी आरोपी भागवत यशवंत चव्हाण याला अटक केली. चौकशी दरम्यान त्‍याने आपल्याला आरबीआय कडून ७५० कोटी रुपये येणार आहेत. त्‍यासाठी ७५ लाखांची कस्‍टम ड्युटी आणि प्रोसेसिंग फी म्हणून आरबीआयला भरायचे होते. असे सांगुन अग्रहारकर यांच्‍याकडून ६८ लाख रुपये घेतले होते. त्‍यासंबंधी आरबीआयकडून आलेल्या पत्राची झेरॉक्स अग्रहारकर यांना दिली होती. बरोबरच आरोपीने अग्रहारकरला मी तुमच्‍या प्रकल्पांमध्‍ये ३० कोटी रुपये ५ वर्षांसाठी १२ टक्के वार्षीक गुंतवतो असे खोटे अश्‍वासन दिले होते, अशी माहिती दिली. तपासादरम्यान अग्रहारकरने आरोपीच्‍या बँक खात्‍यावर ५३ लाख रुपये पाठवले होते. त्‍या रक्कमपैकी बरीच रक्कम आरोपीने के.व्‍ही. गिरधारी याच्‍या बँक खात्‍यावर पाठवल्याचे समोर आले आहे. गिरीधर याने देखील मोठ्या प्रमाणात कॅश डिपॉझीट आरोपीच्‍या खात्‍यावर केली आहे. तसेच आरोपीच्‍या खात्‍यावर अनेक लोकांकडून पैसे आले होते, ते पैसे त्‍याने पुढे के.व्‍ही. गिरीधर याच्‍या खात्‍यात पाठवले. त्‍यामुळे आरोपीने आरबीआयच्‍या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अग्रहारकरने पाठवलेल्या पैशातून आरोपीने सोहेल अन्‍सारी याच्‍याकडून ३० लाख रुपये किंमतीची फोर्ड एनडीव्‍हर हे वाहन (क्रं. एमएच-२०-एफपी-८१०८) खरेदी केल्याचे देखील तपासात स्पष्‍ट झाले आहे.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती/डागळे यांनी आरोपीकडून फसवणुकीची रक्कम हस्‍तगत करायची आहे. आरोपीकडून आरबीआयच्‍या पत्राची मुळ प्रत हस्‍तगत करायची आहे. गुन्‍ह्यात के.व्‍ही. गिरीधर कोण आहेत त्‍याचा प्रकरणाशी काय संबंध आहे याचा तपास करायचा आहे. आरोपीने खरेदी केलेले वाहन हस्‍तगत करायचे आहे. आरोपीची अग्रहारकरशी ओळख करुन देणाऱ्या अक्षय सलामे आणि महेश गाडेकर यांचा गुन्‍ह्यात काही संबंध आहे काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.