अतिवृष्टी बाधीत शेतक-यांच्या मागण्यांसाठी भाजपा किसान मोर्चाचे जनआक्रोश आंदोलन २१ ऑक्टोबरला

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेवराव  काळे यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन

औरंगाबाद, १८ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तोकडी मदत जाहीर केली.मदत तुटपुंजी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.       शेतक-यांना वाढीव मदत हेक्टरी पन्नास हजार रुपये दिली पाहीजे ही  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ची भुमीका असल्याने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर गुरुवार  (२१ ऑक्टोबर)   रोजी दुपारी साडे अकरा ते चार वाजण्याच्या दरम्यान  भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेवराव  काळे यांच्या नेतृत्वाखाली  जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असुन, आंदोलनासाठी मराठवाड्यातुन शेतकरी,पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहेत.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कापुस, मका,सोयाबीन आदि नगदी पिके हातची गेल्याने शेतकरी अर्थीक अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही  उरले नाही.जमीनी खरडुन गेल्याने जमीनीची मशागत कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतक-यांकडे शेतीउद्योगाशिवाय दुसरा उद्योग नसल्याने आगामी हंगामासाठी शेती तयार करण्या- सोबतच संसाराचा गाडा कसा ओढायचा हाही प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गाच्या कोपामुळे पुरपरीस्थीती  निर्माण झालेने पुरात ब-याच ठिकाणी घरातील कर्ती मंडळी वाहुन गेल्याने मृत्यूमुखी पडली.जनावरेही दगावली आहेत. त्यामुळे आगामी वर्ष काढायचे कसे ,खायचे काय हा प्रश्न निर्माण झाल्याने, शेतकरी आत्महत्या करण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

शेतक-यांना या परीस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भरघोस मदत करेल ही अपेक्षा शेतक-यांना होती.परंतु राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये मदत व दोन हेक्टरची मर्यादा घालुन दिली.या मदतीमुळे मशागतीचाही खर्च निघत नाही.जनतेच्या रेट्यामुळे नाईलाजाने राज्य सरकारने थातुर मातुर मदत जाहीर  केल्याने शेतक-यांचा भ्रमनिरास झाला आहे. राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतक-यांच्या  तोंडाला पाने पुसली आहेत.     

राज्यातील महाविकास आघाडी चे सरकार शेतकरी विरोधी, निष्क्रीय सरकार असल्याचे जाहीर केलेल्या मदतीमुळे स्पष्ट झाले आहे. राज्यातील निष्क्रिय सरकारच्या  निषेधार्थ व सरसकट वाढीव मदत हेक्टरी पन्नास हजार दिली पाहिजे. पशुपालकांना प्रति जनावर पन्नास हजार रुपये मदत दिली पाहीजे. शासनाने संपुर्ण मराठवाडा जिरायत धरल्याने मराठवाड्यातील शेतक-यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत खुप कमी पैसे मिळणार आहेत.हा प्रकार मराठवाड्यातील शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आहे. त्यामुळे नैसर्गिक व संरक्षित पाणी असलेले क्षेत्र जसे की पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, माती नाला बांध,सिमेंट बांध ,शेततळी, विहीरी व बोअरवेल असणा-या शिवारास बागायती क्षेत्र ग्राह्य धरुन बागायतीचा निकष लाऊन मदत देण्यात यावी .शासनाने मदत देताना हेक्टरची मर्यादा न ठेवता पेरणी केलेल्या पुर्ण क्षेत्र ग्राह्य धरुन  मदत द्यावी. आदि मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने दि.२१ आक्टोबर २०२१ रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मराठवाडा  विभागीय आयुक्त औरंगाबाद  कार्यालयासमोर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेवराव काळे यांच्या नेतृत्वाखाली  जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी मराठवाड्यातील   शेतक-यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने करण्यात येत आहे.