ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी फेटाळली, हिंदू पक्षकारांना न्यायालयाचा मोठा झटका

वाराणसी : ज्ञानवापी मशीद – शृंगार गौरी मंदिरप्रकरणात वाराणसी न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या वजुखान्यात असलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी करण्याची हिंदू पक्षकारांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे हे शिवलिंग किती पुरातन आहे, किती वर्षांपूर्वीचे आहे, यासाठीची चाचणी करता येणार नाही. हिंदू पक्षकारांकडून मशिदीतील शिवलिंग म्हणजे प्राचीन काळातील विश्वेश्वर महादेव असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी हिंदू पक्षकारांनी कार्बन डेटिंगची मागणी केली होती. परंतु ज्ञानवापी मशिदीकडून या मागणीला जोरदार विरोध करण्यात आला. वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीची बाजू उचलून धरत शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पाच महिलांनी श्रृंगार गौरीचे पूजन करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने मुस्लीम पक्षकारांना झटका बसला होता. या सगळ्यामुळे कार्बन डेटिंगच्या मागणीला मंजूरी मिळेल, अशी हिंदू पक्षकारांची अपेक्षा होती. मात्र, वाराणसी न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावल्याने हिंदू पक्षकारांना मोठा धक्का बसला आहे.

कार्बन डेटिंग म्हणजे काय?

एखाद्या वस्तूचे वय आणि काळ ठरवण्याच्या पद्धतीला कार्बन डेटिंग म्हणतात. कार्बन डेटिंगला ‘रेडिओ कार्बन डेटिंग’ असेही म्हणतात. कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये सी-१४ नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचे अणू वस्तुमान १४ इतके असते. हा कार्बन रेडिओ ॲक्टिव्ह असतो. जसजशी सदर वस्तू नष्ट होते, त्याप्रमाणे हा कार्बनही कमी होतो. यावरून एखाद्या धातू आणि सजीव प्राण्याचे वय ठरवले जाते.