हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला निवडणूक ८ डिसेंबरला निकाल, गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही

नवी दिल्ली ,१४ ऑक्टोबर/प्रतिनिधी :- हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी १२ नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानंतर २६ दिवसांनी म्हणजे ८ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा मात्र शुक्रवारी केली नाही. हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ३ जानेवारीला संपुष्टात येत आहे. गुजरातमध्येही यंदाच विधानसभा निवडणूक होणार आहे. ‘आप’ने तेथे भाजपला आव्हान निर्माण केल्याने गुजरातमधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आयोगाने गुजरात निवडणुकीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले नाही.

निवडणुकीचा कार्यक्रम असा निवडणूक

आयोगाच्या माहितीनुसार, ६८ सदस्यीय हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होईल. २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. २७ तारखेला उमेदवारी अर्जाची पडताळणी होईल. तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. नंतर राज्यात १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणूक होईल व त्यानंतर ८ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. भाजपपुढे सत्ता राखण्याचे आव्हान हिमाचलमध्ये २०१७ मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. तेव्हा भाजपने सर्वाधिक ४४, तर काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. एका जागेवर माकप व २ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. यावेळी ४ मुद्दे हिमाचलमधील निवडणुकीवर परिणाम करू शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांची समस्या, महागाई, बेरोजगारी आणि पोलिस भरती पेपर लीक प्रकरणाचा समावेश आहे. याशिवाय सरकारविरोधात अँटी इन्कम्बन्सीचाही परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षी तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा सर्व जागांवर पराभव झाला होता.