अपडाऊन ; वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचा घरभाडे भत्ता रोखला, शिक्षकांमध्ये संताप

वैजापूर,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 1 हजार 144 शिक्षकांचा घरभाडे भत्ता मुख्यालयी न राहण्याच्या कारणावरून गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे रोखण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनातून घरभाडे भत्त्याची 51 लाख 6 हजार 895 रुपयांची रक्कम कपात करून ती वेतनाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्यालयी न राहता “अपडाऊन” करतात अशी तक्रार सातत्याने होत आहे. भाजपचे आ. प्रशांत बंब यांनी हा प्रश्न लावून धरला असून विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी परिपत्रक काढून मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे पगार रोखण्याचे आदेश काढले होते.या आदेशानुसार तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शिक्षकांचा घरभाडे भत्ता रोखण्यात आला आहे. मुख्यालयी रहात असल्याची खात्री पटल्यानंतर घरभाडे भत्याची रक्कम त्यांना देण्याची सूचना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.