वैजापुरात नवरात्र उत्सवात नागरिकांचा प्रचंड उत्साह

वैजापूर,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येथील क्रांती मित्र मंडळाने शासकीय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर वणी (जि.नाशिक) येथील सप्तश्रृंगी मातेची प्रतिकृती मूर्ती स्वरूपात नवरात्र मध्ये स्थापन केली असून याठिकाणी दररोज देवी भागवत कथा साध्वी वैभवी श्रीजी यांच्या अमृत वाणी तून सुरू आहे. या कथेनंतर रास दांडियाचा कार्यक्रम रात्री बारावाजेपर्यंत चालतो. या दोन्ही कार्यक्रमात महिला, मुली मोठ्या उत्साहाने भाग घेतात. साध्वी वैभवी जी यांनी देवी भागवत कथा सांगत असतांना समाजातील अनेक प्रश्न व समस्या मांडून अध्यात्मकडे ध्यान केंद्रित करण्याचे आवाहन

केले. मोह,माया,मत्सर,राग व द्वेष या विकारातून मुक्ती साठी अध्यात्मकडे वळण्याचा सुमार्ग त्यांनी विशद केला. संपूर्ण शहरातील महिला,मुली व तरुणही सप्तशृंगी मातेच्या मूर्ती समोर दांडियात नऊ दिवस रमले. क्रांती नवरात्रोत्सवाचे आयोजन क्रांती मित्र मंडळाचे पंकज ठोंबरे, किरण व्यवहारे, दिनेश राजपूत, गणेश राजपूत, सोमु सोमवंशी, अमोल बोरनारे, राहुल कुंदे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी केले आहे. सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत हे त्यांना सहकार्य करीत आहेत.