पीएफआयच्‍या पाचही आरोपी पदाधिकाऱ्यांच्‍या पोलिस कोठडीत ४ ऑक्‍टोबरपर्यंत वाढ

औरंगाबाद,२ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्‍या (पीएफआय) पाचही आरोपी पदाधिकाऱ्यांच्‍या पोलिस कोठडीत ४ ऑक्‍टोबरपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एन.एल. मोरे यांनी रविवारी दि.२ ऑक्टोबर रोजी दिले. शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. जुना बायजीपुरा), जालन्याचा अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रहेमान गंज) आणि शेख नासेर शेख साबेर (३७, रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.पोलिस कोठडी दरम्यान आरोपींचे आंतरराष्‍ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. आरोपींकडून राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावर फंडींग होत असल्याचे महत्‍वाचे पुरावे एटीएसच्‍या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे राज्‍यातील नाशिक, नांदेड, मुंबई आणि औरंगाबाद येथून २१ जणांना अटक करण्‍यात आली होती, ते २१ जण एकमेकांच्‍या संपर्कात होते अशी माहिती देखील एटीएसच्‍या हाती लागली आहे.

एनआयने पीएफआय संघटनेविरोधात पुरावे मिळल्यानंतर कारवाईच्‍या काही दिवसांपूर्वी पीएफआयचे बँक खाते गोठवण्‍यास सुरुवात केली होती. कारवाईचा सुगावा लागाताच सप्‍टेंबर महिन्‍यात मडगाव (गोवा) व महाराष्‍ट्रात एक बैठक घेवून संघटनेच्‍या देशातील मुख्‍य व्‍यक्तींना, पदाधिकाऱ्यांना आपल्या मोबाइल आणि इतर सोशल मिडीयावरील डाटा डिलीट करण्‍याचे आदेश दिले होते अशी माहिती देखील एटीएसच्‍या हाती लागली आहे. कोठडी दरम्यान आरोपींच्‍या घराची झडती घेण्‍यात आली होती, यात आरोपींपैकी एक शेख इरफान ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली याच्‍या घरातून १९ इंचाची तलवार सारखे दिसणारे शस्‍त्र हस्‍तगत करण्‍यात आले. तर सर्व आरोपींचे बँक खाते तपासण्‍यात आले असता, त्‍यांच्‍या खात्‍यातून मोठे आर्थिक व्‍यवहार झाल्याचे समोर आले आहे. तसेच एटीएसने आरोपींचे मोबाइल, लॅपटॉप आणि हार्डडिस्‍क हस्‍तगत केल्या असून त्‍यातील डाटा रिक्वर करण्‍यासाठी ते फॉरेन्सिकला पाठविले आहेत. प्रकरणात एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेच्‍या यांनी वरील सर्व मुद्दे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन देत आरोपींच्‍या पोलिस कोठडीत वाढ करण्‍याची विनंती केली.