अखेर पुण्यातील चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातला पूल अखेर रात्री १ वाजून ७ मिनिटांनी जमीनदोस्त करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून चांदणी चौक येथील पूल पाडण्याची तयारी सुरु होती. चांदणी चौकातली वाहतूक अजूनही बंदच आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. ढिगारा हटवण्याचे काम काही तास सुरुच राहणार आहे. तोपर्यंत या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आला आहे.

पुल पाडल्यानंतर आता ढिगारा उचलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढच्या २० मिनिटांमद्धे सगळा ढिगारा साफ होईल अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे. शेवटचे १० ट्रक डेब्री शिल्लक आहे त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग सुरू होईल अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.वाहनचालक पर्यायी मार्ग देखील वापरू शकतात. सकाळी आठ वाजता वाहतूक सुरू होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. पुल पाडल्यानंतर इथला मलबा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टीपर, पोकलेन मशीन अनेक यंत्रसामग्रीने राडारोडा उचलण्याचे काम सुरू आहे.