महाराष्ट्र हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पसंतीचे राज्य – पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

नवी दिल्ली,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र दर्जेदार आणि समग्र आरोग्यसेवेचे प्रवेशद्वार आहे. भारताच्या आरोग्य पर्यटन बाजारपेठेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्य आरोग्यसेवेच्या पर्यटन क्षेत्रात सतत चांगले बदल करीत असल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य आणि उपचारांसाठीचे एक पसंतीचे ठिकाण बनले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  धर्मशाला येथे आयोजित राष्ट्रीय पर्यटन परिषदेत केले.

हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे  उद्घाटन सोमवारी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. आज दुसऱ्या दिवशी या राष्ट्रीय परिषदेस राज्याचे पर्यटन मंत्री श्री. लोढा यांच्यासह इतर 11 राज्यांच्या पर्यटन मंत्री परिषदेस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

श्री. लोढा यांनी सांगितले, आरोग्य पर्यटन क्षेत्राशी निगडीत पायाभूत सुविधा राज्यात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र  हे आरोग्य पर्यटन क्षेत्रात पहिल्या पसंतीचे  राज्य आहे. 4 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. 2 प्रमुख बंदरे तर 53 छोटी बंदरे आहेत. राज्यात जवळपास दीड लाख परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी वर्ग आहे. शीर्ष वैद्यकीय पर्यटन स्थळांपैकी महाराष्ट्र हे एक प्रमुख  आहे.  500 च्या जवळपास योग केंद्र, 1400 रूग्णालय, 1 लाखाच्यावर कौशल्यपूर्ण डॉक्टर्स आहेत. 65 आयुर्वेदिक विद्यालय असल्याची माहिती श्री. लोढा यांनी परिषदेत दिली.

श्री. लोढा म्हणाले, राज्यात ऑर्थोपेडिक आणि सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी बायपास, कृत्रिम गर्भधारणा, कॉस्मेटिक शस्त्रक्रिया, दंत प्रत्यारोपण,  कर्करोग उपचार (रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि इतर प्रगत तंत्रज्ञान), नेत्ररोग शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण  अशा अवघड शस्त्रक्रियांसाठी तसेच इतर आरोग्यसेवांसाठी राज्यात अनेक नामांकित खाजगी तसेच शासकीय रूग्णालये असल्याची माहितीही श्री. लोढा यांनी यावेळी दिली.

आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण संस्था राज्यात असल्याची माहिती देत श्री. लोढा यांनी सांगितले, मुंबईत योगसंस्था, इगतपुरीला (नाशिक) निर्सग उपचार पद्धती, पुणे येथे अय्यंगार योग, गोराई (मुंबई) विपस्सना ध्यान साधना केंद्र,  मिकी मेहता यांचे आरोग्य केंद्र, नागपूरला मेडीसीटी, पुणेला सुविश आरोग्य केंद्र असे राज्यातील विविध ठिकाणी विविध आरोग्याशी निगडीत संस्था असल्याची माहिती दिली.

सध्या आरोग्य पर्यटन म्हणून उपयोगात येणाऱ्या केंद्रांचे विपणन आणि प्रचार प्रसार योग्य पद्धतीने होणे गरजेचे असल्याच्या सूचना श्री. लोढा यांनी केल्या.  हे असंघटित क्षेत्र असल्याचे नोंदविले.  आंतरराष्ट्रीय मानकांशी जोडले जावे, विश्वासार्हता वाढविण्याची गरज असल्याच्याही सूचना श्री. लोढा यांनी या परिषदेत केल्या.