सहकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सचिन परदेशीला चार वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- मस्करी केल्याची तक्रार सुपरवाईजर कडे केल्याने रागाच्या भरात भर सकाळी रस्त्यावर फिल्मी स्टाईलने सहकाऱ्याचा पाठलाग करुन त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सचिन लक्ष्मण परदेशी (२२, रा. धनगरवाडी, हर्सुल) याला चार वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एन.एल. मोरे यांनी ठोठावली.

या प्रकरणात जखमी अजय राजेंद्र टाक (३३, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, फिर्यादी आणि आरोपी दोघे लक्ष्मी बॉडी कंपनीत कॅज्युअल म्हणून काम करतात. आरोपी हा नेहमी फिर्यादीची मस्करी करित होता, फिर्यादीने त्याला वारंवार सांगुनही आरोपी हा मस्करी करीत होता. ९ एप्रिल २०२१ रोजी फिर्यादी व आरोपी दोघे कामावर असतांना आरोपीने पुन्हा फिर्यादीची मस्करी केली. त्यामुळे फिर्यादीने यापूढे माझी मस्करी केली तर सुपरवाईजर कडे तक्रार करेल असे म्हणाला. त्यावर आरोपीने तुला उद्या मी नक्की मारणार असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीची सुपरवाईजरकडे तक्रार केली.

१० एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता फिर्यादी हे सुदर्शन आणि विक्रम काळे या दोघांना सोबत घेत कंपनीतून दुचाकीवर घरी निघाले. सव्वा आठ वाजेच्या सुमारास एफडीसी कार्नर जवळ आरोपी सचिन परदेशी हा अचानक फिर्यादीच्या गाडी समोर आला व काही कळण्याच्या आत त्याने फिर्यादीवर चाकूवर वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे दुचाकीवर काळे बंधू उतरुन लांब बाजुला उभे राहिले. तर फिर्यादी हे जीव वाचविण्यासाठी दुचाकीवरुन उतरुन रस्त्याने पळू लागले. आरोपी देखील त्यांच्या मागे फिल्मी स्टाईलने चाकू घेवून फिर्यादीच्या मागे पळु लागला. काही अंतर पाठलाग केल्यावर आरोपी तेथून निघून गेला. हल्ल्यात फिर्यादी गंभरी जखमी झाले. प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात तपास अधिकारी सहायक निरीक्षक सी.व्‍ही. ओगले यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता अनिल हिवराळे आणि सुर्यकांत सोनटक्के यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी सचिन परदेशी याला दोषी ठरवून भादंवी कलम ३०७ अन्‍वये चार वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार शेख अब्दुल यांनी काम पाहिले.