वैजापूर बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत ; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या – आ. बोरणारे

वैजापूर,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- कुठल्याही संस्थेचा विकास हा योग्य समन्वयातुन होतो. बाजार समितीच्या संचालकानीही समन्वय ठेवूनच तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.  समितीला गरज भासेल त्यावेळी सहकार्य करेन अशी ग्वाही आमदार रमेश बोरनारे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

सभेला जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, मर्चंट बॅकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब संचेती, बाजारसमितीचे सभापती भागीनाथ  मगर, उपसभापती विष्णु जेजुरकर, माजी सभापती बाबासाहेब जगताप,संजय निकम, माजी उपनगराध्यक्ष शेख अकिल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरालगत असलेल्या कांदामार्केट ते घायगाव या रस्त्यासाठी मार्च महिन्या अखेर निधी उपलब्ध करु असे आश्वासन आमदार बोरनारे यांनी यावेळी दिले.

शेतक-याचे  हिताचे संरक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या बाजार समितीला विकासाची उंची नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे लोकनेते स्वर्गीय आर.एम.वाणी ,दिवंगत माजी खासदार रामकृष्ण पाटील , माजी आ.स्व.कैलास पाटील चिकटगावकर या नेतृत्वाचे स्मारक येत्या काळात वैजापूर व शिऊर या ठिकाणी स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करु अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली. वार्षिक अहवाल पुस्तिकेत समितीने  वर्षभरात केलेल्या जाहिरात प्रसिद्धी ,भेटी व समारंभ ,सभापती ,उपसभापतीचे मानधन ,फोन खर्च ,उद्घाटनावर झालेला खर्चावर पालखेडचे नंदकिशोर जाधव यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. सभापतीने या अवाजवी खर्चा संदर्भात खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली होती. सभापती मगर यांनी तीन महिन्यात तुम्हाला या विषयी सर्व माहिती कळवण्यात येईल असे सांगितले मात्र जाधव यांनी सभागृहातच विषय पूर्ण करा अशी मागणी लावून धरल्यामुळे सभेचे कामकाज काही वेळासाठी तापले होते.माजी सभापती रामहरी जाधव यांनी सहा वर्षाच्या काळात आमच्या संचालक मंडळाच्या अंतर्गत संघर्षामुळे येथे कोणतीच आर्थिक अनियमितता झाली नाही अशी टिप्पणी केल्यानतर या चर्चेवर पडदा पडला.

जिल्हा बँकेचे संचालक डॉ परदेशी यांनी राजकरण हा विषय निवडणूकी पुरता मर्यादित असावा. मात्र त्यापुढे विकास करण्यासाठी सर्वांशी समन्वय आवश्यक असतो. शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करा आम्ही सर्व तुमच्या सोबत राहू असे सांगितले. सभापती भागीनाथ मगर यांनी यावेळी वार्षिक ताळेबंदचा आढावा घेतला. सभेचे प्रास्ताविक संचालक सुभाष आव्हाळे यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, प्रशांत सदाफळ, नगरसेवक शेख रियाज, शैलेश चव्हाण, घनश्याम वाणी, देविदास वाणी,  संचालक रावसाहेब जगताप, राजेंद्र कराळे, रामहरी जाधव, ज्ञानेश्वर जगताप, साईनाथ मतसागर, माजी सचिव व्ही.डी. सिनगर,, सहसचिव एस के निकम आदींसह संचालक, शेतकरी व कर्मचारी उपस्थितीत होते.