वैजापूर तालुक्यात लंपी रोगाची लक्षणे असलेली नऊ जनावरे आढळली ; लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

वैजापूर,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- लंपी त्वचा रोगाची लक्षणे आलेली नऊ जनावरे तालुक्यात आढळून आली आहे. पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण सुरू केले असून जवळपास एक हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुवैधकीय अधिकारी डॉ. बाभूळगांवकर यांनी दिली. वैजापुरात पाच, ग्रामीण भागात दोन व रोटेगांव येथे दोन अशी एकूण नऊ जनावरे लंपी त्वचा रोगाची लक्षणे आढळून आली आहे.

या आजारावर अटकाव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लंपी आजाराने तालुक्यात पाय पसरण्यास सुरुवात केली असून पशुधन धोक्यात आले आहे. लंपी त्वचा रोग हा संसर्गजन्य असून या आजारामुळे पशुधन अडचणीत आले आहे. आजाराच्या प्रतिबंधासाठी शासनाने सर्व पशुधनाचे लसीकरण करणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्याचा वेग फारसा नाही. “लंपी” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.