पालखेड धरणांतून 60 क्यूसेसने विसर्ग, नारंगी धरण 62.53 टक्के भरले ; वैजापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

नाशिक जिल्हयात जोरदार पाऊस ; गोदावरी दुथडी भरून वाहू लागली …

जफर ए.खान

वैजापूर,९ सप्टेंबर :- नाशिक जिल्हयात जोरदार पाऊस झाल्याने सर्व धरणे भरली असून नवीन पाणी दाखल होत असल्याने धरणांतून मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. दारणा, गंगापूर, मुकणे, कडवा, वालदेवी, आळंदी या धरणांतून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामार्गे गोदावरीत 31849 क्यूसेसने विसर्ग काल रात्री नऊ वाजता सुरू होता. त्यामुळे गोदावरी पात्र पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहे. आज दुपारी विसर्गात घट करण्यात आली असून 17502 क्यूसेसने गोदावरीत पाणी विसर्ग सुरू आहे. पालखेड धरणांतूनही विसर्ग सुरू असून डाव्या कालव्याद्वारे वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात 60 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. नारंगी धरण 62.53 टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

नारंगी धरणात मोठ्याप्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वैजापूर शहरासह परिसरातील पंधरा ते वीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. नाशिक जिल्हयात गुरुवारी धुवांधार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात मोठ्याप्रमाणात पाऊस होऊन पाण्याची आवक वाढल्याने धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. रात्री उशिरा गंगापूर धरणांतून 2500 क्यूसेस, दारणा धरणांतून 5925 क्यूसेस, मुकणेतून 363 क्यूसेस,वालदेवीतून 183 क्यूसेस,आळंदीतून 30 क्यूसेस, पालखेडमधून 1272 क्यूसेस विसर्ग सुरू होता.आज सकाळनंतर तो कमी कमी होत जाऊन दुपारी तीन वाजेपर्यंत 17502 क्यूसेसपर्यंत कमी करण्यात आला.


गेल्या चार पाच दिवसांपासून वैजापूर शहर व तालुक्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून गुरुवारी एकाच दिवसांत 83 मि.मी.पावसाची नोंद झाली. तालुक्यातील दहा महसूल मंडळात दमदार पाऊस झाला. 9 सप्टेंबरपर्यंत तालुक्यात सरासरी 474 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस लाडगांव मंडळात 642 मि.मी. तर सर्वात कमी 363 मि.मी.पाऊस खंडाळा या मंडळात झाला.

वैजापूर तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस असा वैजापूर -532 मि.मी., लाडगाव -642 मि.मी.,नागमठाण   –  588 मि.मी.,महालगाव    –  582 मि.मी.,लासुरगाव     –  449 मि.मी.,लोणी  –  387 मि.मी.,शिऊर  –   419 मि.मी.,गारज  –   377 मि.मी.,बोरसर –  401 मि.मी.,खंडाळा –  363 मि.मी.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून या पावसाने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे.पावसाने विश्रांती न घेतल्यास त्याचा परिणाम पिकांवर होण्याची  शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

वैजापूर तालुक्यातील विविध प्रकल्प व त्यातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे —

नारंगी मध्यम प्रकल्प          – 62.53 टक्के

बोर दहेगांव मध्यम प्रकल्प   – 22.92 टक्के 

कोल्ही मध्यम प्रकल्प          – 50.54 टक्के

सटाणा लघु तलाव              – 11.07 टक्के

गाढेपिंपळगांव लघु तलाव     – 20.06 टक्के

मन्याड साठवण तलाव          – 72 टक्के