विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ढोल वाजवत वाद्यवृंदाच्या तालावर ठेका धरत विसर्जन मिरवणुकीत घेतला सहभाग

औरंगाबाद,९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणाने गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी औरंगाबादमधील ग्रामदैवत संस्थान गणपती मिरवणुकीला आज सुरुवात झाली. या मिरवणुकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ढोल वाजवत बाप्पाला निरोप देण्यासाठी सहभाग नोंदवला. दानवे यांनी लयबद्ध ढोल वाजविल्याने पथकातील सहभागी झालेले वादक, उपस्थितांनी त्यावर जोरदार प्रतिसाद दिला.

दानवे यांनी नाशिक ढोल वाजवत मिरवणुकीत सहभाग नोंदवत ठेका धरत आनंद व्यक्त केला. मी महत्वाच्या प्रत्येक सणांच्या प्रत्येक मिरवणुकीत ढोल वाजवत असतो. गणेशोत्सवात ढोल वाजवण्याचा एक वेगळा आनंद एक वेगळीच ऊर्जा मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी तितकाच उत्साहाचा आणि दुःखाचा देखील आहे. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस आहे. त्यामुळे आज शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मिरवणुकीत सहभागी होत शेतकरी, कष्टकरी यांच्यावरील संकट दूर करून त्यांना सुख समृद्धी दे आणि पुढच्या वर्षी लवकर ये अशी प्रार्थना बाप्पाकडे केल्याचे दानवे यांनी म्हटले.

यावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे,महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी व संस्थान गणपती मंदिराचे सर्व सदस्य व मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.