वैजापूर शहरात कोविड लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न ; विविध भागात लसीकरण केंद्र सुरू

वैजापूर ,५ मार्च / प्रतिनिधी :- कोविड लसीकरणात औरंगाबाद जिल्हा खूप मागे असून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने तालुका प्रशासनाने कंबर कसली असून शहर व तालुक्यात लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. शहरातील विविध भागातील खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात ही लसीकरण केंद्रात वाढ करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात कोविड निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही.औरंगाबाद जिल्हा तर खूप मागे आहे हे पाहता वैजापूर प्रशासनाने कोविड लसीकरण वाढविण्यासाठी विविध उपाय करण्यास सुरुवात केली असून शहर व तालुक्यात लसीकरण केंद्र वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे व जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी शुक्रवारी (ता.5) शहरातील शेळके हॉस्पिटल तसेच आनंद हॉस्पिटल या दोन खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू केले.जेणे करून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोविड लस सहज घेता यावी. याशिवाय शहरातील अन्य रुग्णालयात ही लवकरच कोविड लसीकरण केंद्र सुरु करुन रुग्णांना लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालय व नगर पालिका रुग्णालय येथे नियमित लसीकरण केंद्र सुरू आहेत.या शिवाय शहराच्या विविध भागातील खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रे सुरू करून अधिकाधिक लसीकरण करून घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. 

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी ही शहरातील दुकान मालक व अन्य नागरिक यांची बैठक बोलावून त्यांनी ही लोकजागृती करून प्रशासनाला कोविड लसीकरण बाबत सहकार्य करावे असे आवाहन केले. तहसीलदार राहुल गायकवाड व पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनीही कोविड लसीकरण अधिक व्हावे म्हणून खंबीर पाऊले उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासनातर्फे व्यक्त केली जात आहे.

डॉ. सुभाष शेळके, डॉ.अन्नदाते यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, उपजिल्हा रुग्णालयचे श्याम उचित,परिचारिका मनीषा गायकवाड, उर्मिला जाधव, निर्मला जाधव, अशोक गाडेकर यांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला आहे. शहर व ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयात कोविड लस मोफत मिळणार आहे नागरिकांनी आधार कार्ड सोबत न्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.